राज्यात ठिकठिकाणी पावसाची जोरदार ‘बॅटिंग’

पोलिसनामा ऑनलाईन – समुद्रावरून वाहणारे वारे आणि मध्य प्रदेशच्या परिसरावर निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्टयामुळे राज्याच्या काही भागात दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी धरणे ओसंडून वाहू लागली आहेत. कोकण आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्रात प्रामुख्याने घाटक्षेत्रांमध्ये गेल्या चोवीस तासांत पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या आहेत.

कोकण विभागात पुढील दोन दिवसांसह मध्य महाराष्ट्रातील घाटक्षेत्रात आज काही ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरावरून बाष्पयुक्त वारे वाहत आहेत. मध्य प्रदेशपासून उत्तर प्रदेशच्या दक्षिण भागापर्यंत सध्या कमी दाबाचा पट्टा कार्यरत आहे. या स्थितीमुळे राज्यात प्रामुख्याने विदर्भ, कोकण भागांत दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. या पट्टयाची तीव्रता कमी होणार असल्याने विदर्भात पावसाचा जोर कमी होईल. गेल्या दोन दिवसांपासून या भागांत जोरदार पाऊस झाल्याने नद्यांची पाणी पातळी वाढली आहे. कोकण विभागात मुंबई आणि ठाण्यासह विविध ठिकाणी जोरदार सरी कोसळल्या. मध्य महाराष्ट्रातील घाट विभागातही मुसळधार सरींची हजेरी आहे.