महाराष्ट्रात काही भागांत वादळी पावसाची शक्यता

पोलिसनामा ऑनलाईन – अरबी समुद्रात चक्रीय वार्‍याची स्थिती असल्याने दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्रतील घाटक्षेत्र आणि विदर्भात काही ठिकाणी ढगांच्या गडगडाटात पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. राज्यात पुण्यासह इतर काही ठिकाणी वादळी, तर तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. मध्य महाराष्ट्रासह राज्यात काही ठिकाणी वादळी पावसाची शक्यता कायम आहे. पावसाच्या विश्रांतीमुळे बहुतांश भागांतील तापमानात वाढ झाली असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.

आठवडयापासून राज्याच्या अनेक भागांत पावसाने उघडीप घेतली होती. मात्र, काल पुणे शहर आणि जिल्ह्यातील काही भागांना वादळी पावसाने झोडपले. नाशिकसह विदर्भात बुलढाण्यासह काही भागांत पावसाची नोंद झाली. बहुतांश भागातील पावसाच्या विश्रांतीमुळे महाबळेश्वर वगळता जवळपास सर्वच ठिकाणी दिवसाच्या कमाल तापमानाचा पारा 30 ते 34 अंश सेल्सिअसच्या आसपास पोहोचला होता. जळगाव येथे उच्चांकी 36 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. हवामान विभागाच्या अंदाजानुसार 6 सप्टेंबरला मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार, तर संपूर्ण राज्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.