पुण्यात पावसाचा ‘हाहाकार’, मृतांचा आकडा 11 वर, बारामतीच्या 14000 जणांना सुरक्षित स्थळी हलवलं

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे ११ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. बुधवारी मध्यरात्री सुरु झालेल्या पावसामुळे सिंहगड, धनकवडी, सहकारनगर, कात्रज या भागातील सोसायट्या आणि घरामध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे प्रचंड हाल सुरू आहेत. एनडीआरएफ आणि अग्निशमन दलाकडून मोठ्या प्रमाणात मदत कार्य सुरु आहे.

मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणचा वीजपुरवठा मोठ्या प्रमाणावर खंडित झालेला आहे. पावसाच्या पाण्यात वाहून गेलेल्यांची संख्या वाढली तर मृतांचा आकडा सुद्धा वाढू शकतो. पुण्याची नागरिकांना महापौर मुक्त टिळक यांनी महत्वाचे आवाहन केले आहे. पुणे शहर परिसरात जोरदार पावसामुळे विविध जनजीवन विस्कळीत झाले आहे. महापालिकेच्या सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे, तरी कृपया नागरिकांनी काळजी करू नये. तसेच कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. याचबरोबर कोणालाही कोणत्याही प्रकारची मदत हवी असल्यास माझ्याशी संपर्क करावा असे मुक्त टिळक यांनी सांगितले आहे.

बारामतीतील अनेक गावांत पूरपरिस्थती –

पुण्यापाठोपाठ बारामती तालुक्यातही पूरपरिस्थती निर्माण झाली आहे. नाझरे धरण क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे नाझरे धरण तुंडूंब भरले आहे. धरणातून तब्बल 85 हजार क्युसेक वेगाने विसर्ग केला जात असून, कऱ्हा नदीला पूर आला आहे. कऱ्हा काठावरील नागरिकांना प्रशासनाने सुरक्षित स्थळी हलवले आहे. आतापर्यंत बारामतीमधून सुमारे १४ हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. मात्र अजूनही काही गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचलेले आहे.

Visit : policenama.com