आगामी 48 तासांत महाराष्ट्रात मुसळधार पाऊस, हवामान विभागाचा रेड अलर्ट जारी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबई शहर आणि उपनगरमध्ये आज (शुक्रवार) सकाळपासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मुंबईतील सखल भागात पाणी साचल्याने तेथील वाहतूक काही वेळ ठप्प झाली होती. यानंतर आता येत्या 48 तासांत मुंबईसह महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. पावसाचा जोर कायम असून, यात वाढ होणार आहे. येत्या 48 तासांत पाऊस आणखी वाढेल परिणामी मुंबईकरांनी घराबाहेर पडू नये, घरी सुरक्षित रहावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. भारतीय हवामान शास्त्र विभागाने पुढील 24 ते 48 तासांसाठी मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. यात मुंबईसह पश्चिम किनारपट्टीचा समावेश आहे. मुंबईत सकाळी 11.30 पर्यंत 15 सेंटीमीटर पावसाची नोंद झाली आहे. पश्चिम किनारी अद्यापही ढग आहेत. येथे 48 तासांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

आता मुंबईत पाऊस कमी झाला आहे. मात्र, पुन्हा तो सक्रीय होईल अशी माहिती मुंबई प्रादेशिक हवामान शास्त्र विभागाचे कृष्णानंद होसाळीकर यांनी दिली आहे. शुक्रवारी (दि.3) मुंबई, रायगड, पुणे, सातारा आणि रत्नागिरीला रेड अलर्ट देण्यात आला आहे. येथे तुरळक आणि अति मुसळधार पाऊस पडेल. शनिवारी (दि. 4) पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, नाशिक, पुणे येथे अत्यंत मुसळधार पाऊस पडेल, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसारच शुक्रवारी पहाटेपासून मुंबई शहर आणि उपनगरामध्ये जोरदार पाऊस पडत आहे.

पूर्व आणि पश्चिम उपनगरासह शहरात सुरु झालेल्या पावसाचा जोर दुपारपर्यंत कायम होता. जून महिना बऱ्यापैकी कोरडा गेला असतानाच जुलै महिन्यात पावसाचा जोर वाढेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. विशेषत: शुक्रवारसह शनिवारी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळेल, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. गुरुवार रात्रीपासूनच मुंबईत पावसाने आपला मुक्कामास सुरुवात केली आहे. पहाटे पावसाचा जोर वाढू लागला. सकाळपासून सुरु झालेला पाऊस दुपारपर्यंत कोसळत होता.