हिना गावित यांचा गौप्यस्फोट, म्हणाल्या -‘जिल्हाधिकाऱ्यांनी शिवसेनेच्या नेत्याच्या खासगी संस्थेला रेमडेसिवीर विक्रीसाठी दिले ‘ (व्हिडीओ)

नंदूरबार : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोना रुग्णांवर उपचारासाठी महत्त्वाचे असलेल्या रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा जाणवत आहे. रेमडेसिवीर इंजेक्शनवरुन राज्यात राजकारण तापले असताना खासदार हिना गावीत यांनी धक्कादायक खुलासा केला आहे. नंदूरबार जिल्ह्यातील आदिवासी कोरोना रुग्णांवर उपचारासाठी सीएसआर फंडातून सरकारला 1 हजार रेमडेसिवीर इंजेक्शन मोफत मिळाली होती. मात्र जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी हे सर्व इंजेक्शन शिवसेनेचे माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या खासगी संस्थेला विक्रीसाठी दिली, असा गंभीर आरोप गावित यांनी केला आहे. यामुळे रेमडेसिवीरचे राजकारण आणखी तापण्याची शक्यता आहे.

खासदार हिना गावित यांनी ऑनलाईन पत्रकार परिषद घेऊन हा धक्कादायक आरोप केला आहे. हिना गावित म्हणाल्या, काँग्रेसच्या तिकीटावर निवडून आलेल्या नंदूरबारच्या नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी यांनी 6 एप्रिल रोजी जिल्हाधिकारी यांना पत्र लिहले. या पत्रातून त्यांनी रोटरी वेलनेस सेंटर या खासगी संस्थेला 1 हजार रेमडेसिवीर इंजेक्शन देण्याची मागणी केली. ही संस्था शिवसेनेचे माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्याशी संबंधित आहे. जिल्हाधिकारी डॉ. भारूड यांना पत्र मिळाल्यानंतर त्याच दिवशी (6 एप्रिल) त्यांनी लेखी आदेश काढले. 1 हजार रेमडेसिवीर इंजेक्शन सरकारी किमतीत रोटरी वेलनेस सेंटर अँड मेडिसीन यांना द्यावेत असे आदेश जिल्हा शल्य चिकित्सकांना दिले. महत्वाचे म्हणजे रोटरी वेलनेसकडून त्याच दिवशी जिल्हा रुग्णालायचे प्रशासकीय अधिकाऱ्यांना 5 लाख 94 हजार 500 रुपयांचा धनादेश मिळाल्याचे जिल्हाधिकारी यांनी आदेशात नमूद केल्याचे गावीत यांनी सांगितले.

हे नियमबाह्य, चौकशी करा

सीएसआर फंडातून नंदूरबारच्या गरीब रुग्णांच्या उपचारासाठी मोफत मिळालेले चार हजार रेमडेसिवीर इंजेक्शन पैकी एक हजार इंजेक्शन हे जिल्हाधिकारी यांनी नियमबाह्य एका खासगी संस्थेला विक्रीसाठी दिले. या इंजेक्शनची विक्री करता येणार नाही, हे स्पष्ट असताना जिल्हाधिकारी 5 लाख 94 हजार रुपयांचा धनादेश स्विकारून या संस्थेला इंजेक्शन विक्रीसाठी दिले. हे देखील चुकीचे असल्याचे गावित यांनी यावेळी म्हटले. शिवसेनेच्या नेत्याशी संबंधित असलेल्या संस्थेचा फायदा करुन देण्यासाठी काँग्रेसच्या नगराध्यक्षांच्या विनंतीवरुन जिल्हाधिकाऱ्यांनी हे कृत्य केले आहे. नगराध्यक्षांचे विनंती पत्र, जिल्हाधिकाऱ्यांना त्याच दिवशी धानादेश मिळणे, जिल्हाधिकाऱ्यांचे त्याच दिवशी आदेश काढणे, केवढी ही तत्परता, हे संशयास्पद आहे. या सर्व प्रकरणाची चौकशी करुन संबंधितांवर कारवाई करावी, अशा मागणी हिना गावित यांनी केली.

जिल्हाधिकाऱ्यांचे कृत्य धक्कादायक

नंदूरबार जिल्ह्यात कोरोनाची साथ मोठ्या प्रमाणावर आहे. अनेक रुग्णांची नोंद केली जात नाही. ज्यांची नोंद होते अशा रुग्णांनी रुग्णालये भरलेली आहेत. रेमडेसिवीरचा तुटवडा आहे. अशा परिस्थितीत जिल्हाधिकारी यांनी एक हजार इंजेक्शन एका खासगी संस्थेला विक्रीला देणे धक्कादायक असल्याचे गावित यांनी म्हटले.