88 व्या अभिष्टचिंतन सोहळ्यापूर्वी आजी-आजोबांना हेलिकॉप्टर सफर, पुण्याहून नेलं मुळगावी अन् जंगी मिरवणूक

संगमनेर : पोलीसनामा ऑनलाइन – यापूर्वी वधुसाठी हेलिकॉप्टर पाठवल्याच्या अनेक बातम्या आपण ऐकल्या किंवा पाहिल्या असतील. मात्र, नातवांनी आपल्या आजी-आजोबांसाठी हेलिकॉप्टर सफर घडवल्याची ही कदाचित पहिलीच घटना असणार आहे. 88 व्या अभिष्टचिंतन सोहळ्याचे औचित्य साधत दोन्ही नातवांनी आपल्या आजी-आजोबांना पुणे ते चिंचोली या त्यांच्या मूळ गावी चक्क हेलिकॉप्टरमधून सफर घडवली आहे. आजी- आजोबांना घडवून आणलेल्या या अनोख्या हेलिकॉप्टर सफरीची सध्या परिसरात जोरदार चर्चा सुरु आहे.

संगमनेर तालुक्यातील चिंचोलीगुरव गावचे गोडगे कुटुंबात हा अनोखा अभिष्टचिंतन सोहळा पार पडला आहे. या कुटुंबातील सर्वात ज्येष्ठ असलेले देवराम व चहाबाई हे दाम्पत्य. त्यांचा 88 वा अभिष्टचिंतन सोहळा त्यांचे नातू अविनाश व नंदकुमार यांनी अविसमरणीय करण्याचा निर्णय घेतला. आजी आजोबांना थेट पुण्याहून हेलिकॉप्टरमधून गावी आणत वाजत गाजत मिरवणूक काढून सोहळा पार पाडला.

दाम्पत्याचा आनंद द्विगुणीत
आयुष्यात प्रथमच हेलिकॉप्टरमधून प्रवास केल्याचा आनंद या दाम्पत्याच्या चेहऱ्यावर दिसून येत होता. गावात हेलिकॉप्टर येणार असल्याचे समजल्याने अनेक आबाल वृद्धांनी गर्दी केली होती. दरम्यान यावेळी गावातून मिरवणूक काढल्यानंतर सोहळ्यानिमित्त निवृत्ती महाराज इंदोरीकर यांचे कीर्तन ठेवले होते. यावेळी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती.