पुण्यात अजब सक्ती, चारचाकी धारकांना ही वापरावे लागेल हेल्मेट..अन्यथा आकारण्यात येईल दंड !!

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – शहरातील वाढते अपघात आणि अपघातातील बळींची संख्या याचा विचार करता, त्यामध्ये दुचाकीस्वारांचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे दुचाकीस्वारांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी हेल्मेट वापरणे गरजेचे आहे. हेल्मेटवापरासाठी सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आहेत. हेल्मेट वापराची आवश्यकता आणि त्याचे फायदे याबाबतही वारंवार प्रबोधन करण्यात आले आहे. त्यामुळे १ जानेवारी २०१९पासून पुण्यात हेल्मेटची प्रभावी अंमलबजावणी करणार असल्याचे डॉ. के. व्यंकटेशम यांनी स्पष्ट केले आहे.
पण शहरामध्ये आज वाहतूक पोलिसांनी चक्क एका चारचाकी वाहन चालकास ‘हेल्मेट’ न वापरल्याबद्दल ‘चलन’ पाठवले आहे. पुणे पोलिसांच्या या कारवाईमुळे आता चारचाकी वाहन चालकांनी देखील हेल्मेट घालून वाहन चालवायचे की काय? असा प्रश्न नागरिक पोलीस प्रशासनाला विचारू शकतात
याबाबत सविस्तर माहिती असे की , महेंद्र पाटे नामक पुण्यातील एका गृहस्थांना आज सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास पुणे वाहतूक विभागाकडून गाडी क्रमांक एमएच १२ एफएफ ३०२६ या क्रमांकाच्या त्यांच्या वाहनाने आज सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास वाहतुकीचे नियम मोडले असल्याने ५०० रुपयांचा दंड आकारला जात असल्याचा संदेश त्यांच्या मोबाईल क्रमांकावर पाठविण्यात आला.
आज सकाळी आपण प्रवासच केला नसल्याने पाटे यांनी वाहतूक विभागाच्या संकेतस्थळावर जाऊन चलन डाउनलोड केले असता त्यांना धक्काच बसला कारण पोलिसांमार्फत फाडण्यात आलेल्या पावतीवर त्यांच्या एमएच १२ एफएफ ३०२६ या क्रमांकाच्या चारचाकी वाहनास ‘हेल्मेट न वापरल्याने’ दंड आकारण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली होती.
पाटे यांनी चालनावरील पुराव्याखातर देण्यात आलेली छायाचित्रे डाउनलोड केली असता काळ्या रंगाच्या हिरो प्लेझर गाडीचे छायाचित्र दिसले. छायाचित्रात दिसणाऱ्या गाडीची नंबर प्लेट पुसट असल्याने पुणे वाहतूक पोलिसांनी कोणतीही शहानिशा न करता चक्क चारचाकी वाहनाच्या नावे चलन फाडले असल्याचे सिद्ध होत आहे.
पाटे यांच्यासोबत घडलेल्या या प्रकारावरून पुणे वाहतूक पोलिसांच्या वेडसर कारभाराची प्रचिती पुन्हा एकदा पुणेकरांना आली आहे.
पुण्यात दुचाकीचालकांनी वाहन चालविताना हेल्मेट घातले नसल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. पुण्याचे पोलिस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी येत्या नवीन वर्षांत एक जानेवारीपासून त्याची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शहर पोलिसांकडून पुणेकरांना नवीन वर्षाचे ‘गिफ्ट’च मिळणार असल्याची चर्चा रंगली आहे.
‘दुचाकी चालकांनी हेल्मेट घालणे बंधनकारक आहे’ असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वीच दिला आहे. देशातील अनेक शहरांत त्या निर्णयाची अंमलबजावणी केली जात आहे. मात्र, पुणे शहरात या नियमाकडे काणाडोळा केला जातो. पोलिस दलाकडून या निर्णयाच्या अंमलबजावणीस सुरुवात झाल्यानंतर पुणेकर नागरिक, संस्था, संघटना आणि राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींकडून त्यास तीव्र विरोध केला जात असल्याचे अनेकदा पाहायला मिळाले आहे. हेल्मेट सक्तीच्या विरोधात शहरात यापूर्वी अनेक मोर्चेही काढण्यात आले आहेत. त्यामुळे एक जानेवारीपासून केली जाणारी कारवाई किती काळ टिकणार, असा प्रश्‍न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.