मंदिर बांधून दुष्काळ मिटेल का ? शेतकरी आत्महत्या थांबतील का ?  हेमंत ढोमे

मुंबई : पोलीसनामा आॅनलाईन-दसरा मेळाव्यादरम्यान उद्धव ठाकरे यांनी आपण २५ नोव्हेंबर रोजी अयोध्येला जाणार असल्याची घोषणा केली होती. याच पार्श्वभूमीवर राम मंदिर उभारण्याची मागणी घेऊन काही हिंदुत्ववादी संघटनांसह शिवसेना २५ नोव्हेंबर रोजी अयोध्येत एकत्र येणार आहेत. काही शिवसैनिक तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सहपरिवार आज अयोध्येत दाखलही झाले. मुख्य म्हणजे सदर अयोध्या दौरा करताना नुकताच पूजन केलेला शिवनेरी गडावरील मातीचा कलशही त्यांनी सोबत घेतला आहे. असे सगळे असताना आता  या संपूर्ण घटनेवर अभिनेता हेमंत ढोमेनं ट्विट करत सणसणीत टोला लगावला आहे.

काय म्हणाला हेमंत ढोमे ?

‘छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेली माती अयोध्येला जाणार. का? काय संबंध? म्हणजे काय करायचंय नेमकं? अहो मातीत चाललेले त्यांचे गडकिल्ले बांधायचं बघा आधी. हातचं सोडून पळत्याच्या मागे लागायची जुनी खोड,’ अशी संतप्त प्रतिक्रिया त्याने दिली आहे. ते मंदिर बांधून दुष्काळ मिटेल? शेतकरी आत्महत्या थांबतील? गरिबी जाईल? भूकबळी थांबतील? दरवाढ कमी होईल? मरण स्वस्त होईल? अन्न, वस्त्र, निवारा सगळं मिळेल, असे प्रश्न त्याने उपस्थित केले आहेत. इतकंच नव्हे तर शिवनेरी गडावरील माती नेण्यामागचं कारण काय असा प्रश्न एका नेटकऱ्याने विचारलं असता त्यावर उत्तर देताना हेमंतने शिवसेनेला टोमणा मारला आहे. ‘प्रभु रामचंद्राचे भक्त होते छत्रपती शिवाजी महाराज! म्हणून त्यांच्या ढासळलेल्या किल्ल्याची माती मंदिर बांधायला न्यायचीय! तसा खूप व्यापक आणि गहन विचार आहे. आपल्या सगळ्यांना काळाच्या पुढे घेऊन जाणार हे सगळं! खुप पुढे,’ असं तो म्हणाला.

उद्या म्हणजेच २५ नोव्हेंबरला (रविवारी) उद्धव ठाकरेंची सभा होणार आहे. सदर सभेद्वारे उपस्थितांना ते संबोधित करणार आहेत. यावेळी राम मंदिर उभारण्याची आग्रही मागणी करण्यात येणार आहे. इतकेच नाही तर शिवसेना-भाजपामधील तणावाचे वातावरण पाहता या सभेमध्ये मोदी सरकारसह फडणवीस सरकारवरही उद्धव ठाकरे बरसण्याची शक्यता आहे. महत्त्वाची बाब अशी की, या ठिकाणी ते हिंदीतून भाषण करण्याची शक्यता आहे. इतेकच नाही तर उद्या म्हणजेच रविवारी उद्धव ठाकरे सहपरिवार सकाळी ९ वाजता रामलल्लाचे दर्शन घेतील.