भोर-वेल्हा-मुळशी तालुक्यात होणार हायटेक बांबु नर्सरी – बांबू उत्पादक व उद्योजक महासंघाचे सचिव संतोष दिघे

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – भोर, वेल्हा, मुळशी तालुक्यात धरणांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. धरणांसाठी जमीन संपादन झाल्यानंतर उर्वरित क्षेत्र डोंगर उतार व शेतीसाठी अयोग्य आहे. त्यामुळे तेथे स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून दिल्यास धरणग्रस्तांचे विस्थापन थांबून धरणग्रस्तांच्या अडचणी कमी होण्यास मदत होईल. या विचारातून बांबू लागवड मोठ्या प्रमाणात होणे आवश्यक आहे, असे मत बांबू उत्पादक व उद्योजक महासंघाचे सचिव संतोष दिघे यांनी व्यक्त केले.

कोंकण कृषी विद्यापीठ दापोलीच्या वतीने डॉ. अजय राणे यांच्या मार्गदर्शनाखाली व बांबू प्रमोशन फाउंडेशनच्या मदतीने व कृषी खाते आत्मा प्रकल्प पुणे यांच्या शेतकऱ्यांना शास्त्रीय पध्दतीने बांबु रोपवाटिका उभारणीसाठी 27, 28, 29 जानेवारी रोजी दापोली कृषी विद्यापीठ येथे प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन केले होते. याप्रसंगी महासंघाचे हनुमंत देशमुख, अनंता निवंगुणे, सुवर्णा सुकाळे, राजेंद्र कंक, प्रशांत दाते, गणेश दिघे, आत्मा पुणे वतीने निलेश अब्दागिरी उपस्थित होते.

दिघे म्हणाले की, या प्रशिक्षणासाठी भोर, वेल्हा, मुळशी तालुक्यातील ४१ शेतकऱ्यांची निवड करण्यात आली होती. या प्रशिक्षणामध्ये महिलांनाही सहभागी करून घेण्यात आले होते. लागवडीसाठी पारंपरिक कंद लागवडीला मर्यादा आहेत. मात्र, यशस्वी रोप वाटिका होणे व लागवडीसाठी रोप उपलब्धता करून देणे आवश्यक आहे. संतोष दिघे यांनी भोर वेल्हा मुळशी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या सहकार्याने हायटेक बांबू रोपवाटिकांची उभारणी करून या भागात बांबू लागवड वाढवण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला