विमानाने पुण्यात येऊन घरफोडी करणारा हायटेक चोर जेरबंद

पुणे (वाकड) : पोलीसनामा ऑनलाइन – विमानाने पुण्यात येऊन नामांकित हॉटेलमध्ये राहून परिसरातील बंद घरात दिवसाढवळ्या चोरी करून लाखो रुपयांचे दागिने चोरणाऱ्या हायटेक चोराच्या वाकड पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. वाकड पोलिसांनी चोरट्याला उत्तर प्रदेशातून अटक केली. त्याच्याकडून ८ लाख रुपये किंमतीचे २५ तोळे सोने जप्त करण्यात आले आहे. अनिल मिश्री राजभर (वय-३५ रा. बोदरी, जि. जैनपुर, उत्तर प्रदेश) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २२ जुलै रोजी वाकड येथील माऊली रेसीडेन्सी आणि २५ जुलै रोजी थेरगाव येथील ओशियन मिडोज सोसायटीतील बंद घरामध्ये चोरी झाली होती. माऊली रेसीडेन्सी मधील बंद घरातून ९ तोळे सोन्याचे दागिने, लॅपटॉप तर थेरगाव येथील बंद घरातून १३७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने चोरीला गेले होते. तीन दिवसांमध्ये दोन उच्चभ्रू सोसायटीमध्ये घरफोडी झाल्याने आरोपीला पकडणे पोलिसांसमोर आव्हान होते.

Wakad-Police-Station

पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही तपासून तीन पथकांच्या सहाय्याने गुन्ह्याचा तपास सुरु केला. त्यावेळी एका नामांकित हॉटेलच्या वेटरला एका व्यक्तीची हालचाल संशयास्पद आढळून आली. त्यावरून पोलिसांनी त्या व्यक्तीचा शोध घेऊन पोलिसांनी आरोपीला उत्तर प्रदेशातून ताब्यात घेतले. त्याला न्यायालयात हजर करून त्याची १० दिवसांची पोलीस कोठडी घेऊन सखोल चौकशी केली. चौकशी दरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिली. आरोपीवर वळीव पोलीस ठाण्यात तीन तर शिवाजीनगर पोलीसठाण्यात एक घरफोडीचा गुन्हा दाखल आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त आर.के. पद्मनाभन, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ, पोलीस उपायुक्त विनायक ढाकणे, सहायक पोलीस आयुक्त श्रीकांत मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली वाकड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतिश माने, पोलीस उपनिरीक्षक हरिश माने, सिद्धनाथ बाबर, तपास पथकातील पोलीस कर्मचारी विक्रम जगदाळे, प्रशांत गिलबिले, नितीन गेंगजे, तात्यासाहेब शिंदे, बापुसाहेब धुमाळ, बिभीषन कन्हेरकर, नितीन ढोरजे, जावेद पठाण, दिपक भोसले, प्रमोद भांडवलकर, भैरोबा यादव, विजय गंभीरे, शाम बाबा, विक्रम कुदळ, प्रमोद कदम, सुरेश भोसले, नुतन कोंडे यांच्या पथकाने केली.

आरोग्यविषयक वृत्त –