जीवघेणी लपाछपी; 2 वर्षीय मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू, वडिलांची आत्महत्या

कोईम्बतूर : वृत्तसंस्था – अनेकदा खेळीमेळीतून किंवा गंमती गंमतीत अनेक भयानक  घटना घडतात. अशीच एक भयानक घटना लपाछपीतून घडल्याचे समोर आले आहे. लपाछपी खेळत असताना एका दोन वर्षांच्या मुलाचा पाण्याच्या टाकीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटनेचा मुलाच्या वडिलांना जबरदस्त धक्का बसला. हा धक्का सहन न झाल्याने  वडिलांनीही आत्महत्या करुन आपलं आयुष्य संपवल्याचं समोर आलं आहे. मनिकंदन (वय 32 वर्ष) असे आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे. मनिकंदन हे घरामध्ये मुलगी देवदर्शिनी (वय 5 वर्ष)सोबत लपाछपीचा खेळ खेळत होते. यावेळेस त्यांचा मुलगा देजश्विन(वय 2 वर्ष) घरामध्येच खेळत होता तेव्हा ही घटना घडली.
तामिळनाडूतीलजीवघेणी लपाछपी; 2 वर्षीय मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू, वडिलांची आत्महत्या
 कोईम्बतूर येथील ही घटना आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनिकंदन त्यांच्या मुलीसोबत खेळत होते यावेळी त्यांच्या अचानक लक्षात आलं की, त्यांचा मुलगा गायब आहे. यानंतर त्यांनी तातडीनं आपल्या मुलाचा शोध घेण्यास सुरुवात केली. खूप वेळ शोध घेतल्यानंतर त्यांना देजश्विन उघड्या असलेल्या पाण्याच्या टाकीत बुडालेला दिसला. हे दृश्य पाहून मनिकंदन यांना धक्काच बसला. त्यांना हा धक्का अजिबात सहन झाला नाही.
यानंतर त्यांनी आपल्या मुलीला आवाज न करता खेळ सुरू ठेवण्यास सांगितले. स्वतः लपत असल्याचं सांगत त्यांनी मुलीला शोधायला सांगितले. यानंतर मनिकंदन एका खोलीत जाऊन लपले, पण तेथून ते बाहेर आलेच नाहीत. बराच प्रयत्न करुन बाबा सापडत नसल्याचं लक्षात आल्यानंतर मुलीनं आईकडे धाव घेतली.
दरम्यान मनिकंदन यांच्या पत्नीनंही दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र दरवाजा काही केल्या उघडत नव्हता. अखेर त्यांनी खोलीची खिडकी उघडली. यानंतर त्यांना जे काही दिसलं ते पाहून त्यांच्या पत्नीच्या पायाखालची जमीनच सरकली. मनिकंदन हे पंख्याला लटकलेले दिसले. मनिकंदन यांनी पंख्याला गळफास घेऊन स्वतःचे आयुष्य संपवले होते. आरडाओरडा करत त्यांच्या पत्नीनं शेजाऱ्यांना बोलावलं. यानंतर मुलाचा शोध घेतला असता त्यांचं दोन वर्षांचं बाळ पाण्याच्या टाकीत बुडालेलं दिसलं.
 पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 6 वर्षांपूर्वीच या दाम्पत्याचं लग्न झाले होते. मुलाच्या मृत्युचा धक्का पचवू न शकल्यानं मनिकंदन यांनीही आत्महत्या केली. दरम्यान,वडील-मुलगा दोघांचेही मृतदेह ताब्यात घेऊन पोलिसांनी ते पोस्टमार्टेमसाठी पाठवले आहेत.