PM मोदींच्या दौर्‍यात हिंसाचार पसरवून मौजमजा करणार्‍या हिफाजतच्या नेत्याला महिलेसोबत रंगेहाथ पकडलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  गेल्या महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी २६ मार्चला बांगलादेश दौऱ्यावर गेले होते. तेव्हा तिथे मोदींविरोधात हिफाजत-ए-इस्लाम नावाच्या संघटनेने हिंसाचार केला होता. तेथील चटगाव आणि ब्राम्हबरिया भागात पोलिसांनी केलेल्या कारवाईत डझनभर आंदोलकांचा मृत्यू झाला. मोदींच्या दौऱ्यानंतरही हे आंदोलन सुरु राहिल्याने ही संघटना चर्चेत आली होती. आता पुन्हा हिफाजत-ए-इस्लाम चर्चेत आली आहे. या संघटनेच्या संयुक्त महासचिवाला एका रिसॉर्टमध्ये महिलेसोबत अश्लिल कृत्य करताना पकडण्यात आले आहे. हे प्रकरण दाबण्य़ाचा प्रयत्न एकीकडे करण्यात येत असताना बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी हे लोक इस्लामच्या नावाला कलंक असल्याचे म्हटले आहे.

कट्टरपंथी संघटना हिफाजत-ए-इस्लामचे संयुक्त महासचिव मामूनुल हक याला एका रिसॉर्टमध्ये एका महिलेसोबत पकडण्यात आले. हक यांच्या सोबत ज्या महिलेला पकडण्यात आले तिला त्यांनी दुसरी पत्नी असल्याचे म्हटले. ढाका ट्रिब्युनच्या बातमीनुसार मामूनुल याला शनिवारी बांगलादेशातील सोनारगावच्या एका रिसॉर्टमध्ये एका महिलेसोबत रंगेहात पकडण्यात आले होते. यामुळे देशभरात वाच्यता झाल्याने इज्जत वाचविण्यासाठी ते आता दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. धक्कादायक म्हणजे ही महिला ब्युटी पार्लर चालविते. हॉटेलमध्ये जाताना त्यांनी तिला दुसरी पत्नी असे सांगितले होते.

शेख हसीना यांनी म्हटले की, हिफाजत ए इस्लामने इस्लामचा अवमान केला आहे. रविवारी संसदेच्या १२ व्या सत्राला संबोधित करत असताना त्यांनी हे आरोप केले. मला त्यांच्या चारित्र्यावर काही बोलायचे नाही. तुम्ही सर्वांनीच त्यांना शनिवारी अपवित्र काम करताना पाहिले आहे. ते नेहमी कर्म आणि धर्माच्या नावावर बोलत असतात. देशभरात हिंसाचार पसरवून मामूनुल मौज-मजा करण्यासाठी एका सुंदर महिलेसोबत एका रिसॉर्टवर गेले. ते इस्लामच्या नावे कलंक आहेत. हे लोक इस्लामला बदनाम करत आहेत.

इस्लाम माननारा कोणीही व्यक्ती खोटे बोलू शकतो का? असे लोक धर्माचे कसे पालन करतील आणि लोकांना तरी काय सांगतील. अशा काही लोकांमुळे इस्लामचे नाव दहशतवाद आणि चारित्र्यहिन लोकांशी जोडले गेले आहे, असा आरोप हसिना यांनी केला. महत्वाचे म्हणजे, गेल्या काही वर्षांपासून हिफाजत-ए-इस्लामची ताकद वेगाने वाढली आहे. बांगलादेशमध्ये राजकीय दृष्ट्या त्यांचा दबदबाही वाढू लागला आहे. या संघटनेने धर्मनिरपेक्षतेची बाजू मांडणाऱ्या शेख हसीना यांच्या अवामी लीगच्या नाकीनऊ आणले आहे.

यामुळे आजच्या या प्रकरणाचा समाचार हसीना यांनी थेट संसदेत घेतल्याने हे प्रकरण तापण्याची चिन्हे आहेत. बांगलादेशमध्ये धर्मनिरपेक्षता देणे आणि संविधानात बदल करण्याविरोधात हसीना सरकारला या संघटनेने नेहमी विरोध केला आहे. हिफाजत-ए-इस्लाम ही संघटना स्वत:ला इस्लामचा रक्षक मानते. या संघटनेची स्थापना २०१० मध्ये करण्यात आली.२००८ मध्ये हसीना सरकारने महिलांना संपत्तीत समान वाटा, धर्मनिरपेक्षता, कर्ज आदी मुद्द्यांवर निवडणूक लढविली होती. त्या निवडूनही आल्या होत्या. यानंतर त्यांनी केलेल्या सुधारणांना विरोध करण्यासाठी ही संघटना पुढे आली.