नारायण राणेंवर भाजपा ‘खूश’ ! गृहमंत्री अमित शाह येणार कोकण दौर्‍यावर

पोलीसनामा ऑनलाइन टीम –   दिल्लीत शेतकरी आंदोलनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे अमित शाह यांचा कोकण दौरा अनिश्चित मानला जात होता. मात्र, आता अमित शाह यांनी ६ फेब्रुवारीला कोकणात येण्याचे निश्चित केले आहे. दरम्यान, भारतीय जनता पक्षात जाऊन दबदबा निर्माण करण्यात माजी मुख्यमंत्री आणि खासदार नारायण राणे यांना यश आले आहे. गेल्याच आठवड्यात खासदार राणे यांची सुरक्षा महाविकास आघाडी सरकारकडून कमी करण्यात आली. मात्र काही दिवसांतच केंद्र सरकारने राणे यांना पुन्हा वाय दर्जाची सुरक्षा देऊ केली होती. आता खुद्द केंद्रीय गृहमंत्री अमित शाह कोकण दौऱ्यावर येणार असल्याचे समजते. त्यामुळे राणेंच्या कामगिरीवर पक्षश्रेष्टी खूश असल्याचे समजते.

नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत सिंधुदुर्गासह कोकणातील अनेक जिल्ह्यांमध्ये भाजपला लक्षणीय यश मिळाले होते. नारायण राणे यांच्या नेतृत्त्वामुळे शिवसेनेच्या कोकणातील या वर्चस्वाला आव्हान देणे भाजपला जमले, असे बोलले जात होते. त्यामुळे सध्या भाजप पक्षश्रेष्ठी नारायण राणे यांच्या कामगिरीवर खुश असल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर, भाजपचे चाणक्य अमित शाह येत्या ६ फेब्रुवारीला कोकणाच्या दौऱ्यावर येणार आहेत. भाजप खासदार राणे यांच्या सिंधुदुर्गातील लाईफटाईम वैद्यकीय महाविद्यालयाच्या कार्यक्रमाला अमित शाह उपस्थित राहणार आहेत. आता या दौऱ्याच्यानिमित्ताने महाराष्ट्रातील राजकारण पुन्हा एकदा तापण्याची शक्यता आहे. कारण, या कार्यक्रमाला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि प्रवीण दरेकर हेदेखील उपस्थित राहणार आहेत.