पतीचा पगार वाढला तर पत्नीला सुद्धा वाढीव अंतरिम देखभाल भत्त्याचा अधिकार – हायकोर्ट

चंडीगढ : वैवाहिक वादाच्या एका प्रकरणात पंचकुला फॅमिली कोर्टाने पत्नीचा अंतरिम देखभाल भत्ता 20000 वरून 28000 करणे योग्य ठरवत, हायकोर्टने यामध्ये दखल देण्यास नकार दिला. हायकोर्टने पतीची याचिका फेटाळत म्हटले की, पतीचे वेतन वाढले असेल तर पत्नीला सुद्धा वाढीव अंतरिम देखभाल भत्त्याचा अधिकार आहे.

पंचकुला येथे राहणारे वरुण जगोट्टा यांनी हायकोर्टात याचिका दाखल करून पंचकुला फॅमिली कोर्टाच्या पाच मार्च 2020 च्या आदेशाला आव्हान दिले होते. याचिकाकर्त्याने सांगितले की, फॅमिली कोर्टाने आपल्या निर्णयात म्हटले आहे की, याचिकार्त्याचे वेतन 95 हजारावरून वाढून 114000 झाले आहे, जे खरे नाही. याचिकाकर्त्याने सांगितले की, सर्व कपातीनंतर त्यास 92175 रुपये वेतन मिळते आणि अशात 28 हजार अंतरिम देखभाल भत्ता देण्याचा आदेश कसा दिला जाऊ शकतो.

हायकोर्टने याचिकाकर्त्याची मागणी फेटाळत म्हटले की, रिव्हिजन याचिकेत हायकोर्टने दखल देण्याची शक्यता खुप कमी आहे. असे तेव्हा होते जेव्हा आदेश कायद्याच्या विरोधात किंवा पक्षपात करणारा असेल. या प्रकरणात असे काहीही दिसत नाही.

एकीकडे जिथे पतीच्या वेतनात वाढ झाली आहे तर दुसरीकडे पत्नीच्या घराच्या भाड्यात सुद्धा 1500 रुपयांची वाढ झाली आहे. अशावेळी फॅमिली कोर्टाने आपला निर्णय सुनावताना सर्व बाजू तपासल्या आहेत आणि आदेश सविस्तर आहे. हायकोर्टने याचिकाकर्त्याला कोणत्याही प्रकारचा दिलासा देण्यास नकार देत त्याची याचिका फेटाळून लावली.