सोनू सूदला उच्च न्यायालयाकडून दणका; अभिनेत्याची बेकायदा बांधकामावरील आव्हान याचिका फेटाळली

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – जुहूच्या इमारतीत बेकायदा बांधकाम केल्याप्रकरणी व इमारतीतील फ्लॅटचे हॉटेल रूममध्ये रूपांतर केल्याने मुंबई महापालिकेने अभिनेता सोनू सूदला नोटीस बजावली होती. त्याविरुद्ध सोनू सूदने उच्च न्यायालयात याचिका दाखल केलेली. आता उच्च न्यायालयाने ती याचिका फेटाळत सोनू सूदला दणका दिला आहे.

याबाबत सोनू सूदने पालिका आपल्यासोबत भेदभाव करत असल्याचा आरोप केला आहे. तो म्हणाला, ही इमारत १९९२ पासून उभी असून ती बेकायदा नाही. मी ही इमारत २०१८-१९ साली घेतली. त्याची कागदपत्रे आहेत. तेव्हापासून ही इमारत आहे तशीच आहे. त्यात कोणताही बदल केला नाही. पालिकेने एमआरटीपी कायद्याच्या कलम ५३ अन्वये नोटीस बजावताना त्यात कथित अनधिकृत बांधकामाचा कोणताही उल्लेख केला नाही.

येथील येणार पैसा मी सामाजिक कार्यासाठी वापरतो. कोरोनाच्या दरम्यान ही इमारत पोलिसांना राहण्यासाठी दिली होती. कारण ते २४ तास कर्तव्यावर होते, असेही सोनुने न्यायालयात म्हटले.

दरम्यान, पालिकेच्या वतीने बाजू मांडताना ज्येष्ठ वकील अनिल साखरे न्यायालयात म्हणाले, सोनू सूदने तसे पुरावे दाखल केले नाहीत. या बांधकामाचा काही भाग नोव्हेंबर २०१८ आणि फेब्रुवारी २०२० मध्ये पाडला. तरी सुद्धा त्याने तो भाग पूर्वस्थितीत आणला. याचिकाकर्त्याने सत्य लपवले आहे, असेही साखरे न्यायालयात म्हटले.