दिलासा ! लालू प्रसाद यादव यांना झारखंड उच्च न्यायालयाकडून मिळाला जामीन, चारा घोटाळयात भोगत होते शिक्षा

रांची : पोलीसनामा ऑनलाइन –   देशभरात गाजलेल्या बिहारच्या चारा घोटाळयाच्या दुमका कोषागार प्रकरणी शिक्षा भोगत असलेले राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव यांचा जामीन शनिवारी (दि. 17) झारखंड उच्च न्यायालयाने मंजूर केला आहे. या निर्णयानंतर आता त्यांचा तुरुंगातून सुटका होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दुमका कोषागारमधून अवैधरित्या 3.13 कोटी काढल्याप्रकरणी त्यांना जामीन मिळाला आहे. या घोटाळ्यातल्या 4 प्रकरणांसंदर्भात त्यांना शिक्षा सुनावली आहे. यातील 3 प्रकरणात त्यांना यापूर्वीच जामीन मिळाला आहे.

लालूप्रसाद यादव यांचे वकिल देवर्षि मंडल यांच्या म्हणण्यानुसार, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता याप्रकरणी ऑनलाईन सुनावणी झाली. झारखंड उच्च न्यायालयाचे न्यायाधीश अपरेश सिंह यांच्या खंडपीठाने दुमका कोषागार प्रकरणी सुनावणीनंतर लालू प्रसाद यांना जामीन देण्याचा निर्णय घेतला आहे. दुमका कोषागारमधून अवैधरित्या रक्कम काढल्याप्रकरणी यापूर्वी देखील अनेकदा सुनावणी झाली होती. मात्र यादव यांना दिलासा मिळाला नव्हता. आपण अर्धी शिक्षा भोगली असल्याचे यादव यांच्याकडून दाखल केलेल्या याचिकेत म्हटले होते. तसेच आपले वय खूप असून विविध गंभीर आजाराने आपण ग्रस्त आहोत, त्यामुळे आपल्याला जामीन मिळावा, असे याचिकेत नमूद केले होते. दरम्यान वडिलांच्या सुटकेसाठी त्यांची मुलगी रोहिनी आचार्य रोजा धरणार होती. सोशल मीडियाच्या माध्यमातून रोहिणीने स्वतः याबाबतची माहिती दिली होती. तसेच मुलगा तेजप्रताप याने देवीची पूजा सुरु केली होती. तर तेजस्वी यादव देखील मंदिरात दर्शनासाठी गेले होते, असे वृत्त काही दिवसापूर्वीच समोर आले होते.