दुर्देवी ! उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींचा VVIP रुग्णालयात बेड न मिळाल्याने मृत्यू

लखनऊ: पोलीसनामा ऑनलाइन – देशात कोरोनाने थैमान घातले आहे. दिवसागणिक रुग्णसंख्या वाढत असल्याने आरोग्य यंत्रणा व्हेंटिलेटरवर आहे. देशाच्या अनेक राज्यांमधील परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. उत्तर प्रदेश सरकार मोठमोठे दावे करण्यात मग्न असताना दुसरीकडे सर्वसामान्यांपासून विशेष व्यक्तींना देखील मनस्ताप सहन करावा लागत आहे. उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींना व्हिव्हीआयपी रुग्णालयात बेड न मिळाल्याचा प्रकार घडला आहे. वेळेत उपचार न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी अलाहाबाद उच्च न्यायालयाने उत्तर प्रदेश सरकारला उत्तर देण्यास सांगितले आहे. मात्र अद्याप तरी सरकारने न्यायालयाला कोणतेही उत्तर दिले नाही.

व्ही. के. श्रीवास्तव असे निधन झालेल्या न्यायाधीशांचे नाव आहे. श्रीवास्तव यांना 23 एप्रिलला त्यांना लोहिया रुग्णालयात दाखल केले होते. मात्र त्यांना कोणत्याही वैद्यकीय सुविधा मिळाल्या नाहीत. लखनऊमध्ये व्हिव्हिआयपी रुग्णांसाठी स्वतंत्र रुग्णालय आहे. मात्र तिथे श्रीवास्तव यांना बेड मिळाला नाही. अलाहाबाद उच्च न्यायालयाने न्यायमूर्ती श्रीवास्तव यांच्या निधनाच्या चौकशीसाठी समिती स्थापन केली आहे. श्रीवास्तव यांना आरएमएल रुग्णालयात सुविधा मिळाल्या नाहीत. प्रकृती बिघडल्यानंतर त्यांना पीजीआयमध्ये हलविण्यात आले होते. त्याठिकाणी त्यांचे उपचारा दरम्यान निधन झाल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.