१४ वर्षाच्या मुलीसोबत लग्न करणाऱ्या ५६ वर्षीय वकिलावरील गुन्हा रद्द करण्यास न्यायालयाचा नकार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – १४ वर्षाच्या अल्पवयीन मुलीसोबत लग्न केल्याप्रकऱणी ५६ वर्षीय वकिलावरील खटल्यात मुंबई उच्च न्यायालयाने त्याच्यावरील गुन्हा रद्द करण्यास तुर्तास नकार दिला आहे. तर त्याच्यावरील खटल्याला सशर्त अंतरिम स्थिगीती देत मुलीच्या भविष्यासाठी ११ एकर जमीनीसह ७ लाख ५० हजार रुपये कायमस्वरुपी ठेव म्हणून ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले.

अल्पवयीन मुलीशी लग्न केल्याप्रकऱणी संबंधित वकिलावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान याप्रकरणात त्याने १० महिने कारावास भोगला आहे. त्याने याप्रकरणी आपल्यावरील गुन्हा रद्द करण्याबाबतची याचिका न्यायालयात दाखल केली होती. संबंधित गुन्हा रद्द करण्यासाठी संबंधित मुलीने १८ वर्षाची झाल्यानंतर प्रतिज्ञापत्राद्वारे संमतीही दिली आहे.

मात्र याला विरोध करत सरकारी वकील अरुणा पै यांनी हा गुन्हा सहजासहजी रद्द केल्यास चुकीचा पायंडा पडेल असा युक्तीवाद केला. त्यानंतर न्यायालयाने या सर्व प्रकाराबाबत चिंता व्यक्त करत हे प्रकरण गंभीर आहे. त्यामुळे या खटल्याच्या कारवाईला अंतरिम स्थगिती देत मुलीच्या नावे ११ एकर जमीन आणि तिच्या शिक्षणाचा खर्च म्हणून व भविष्यातील निर्वाहासाठी साडेसात लाख रुपये कायमस्वरुपी ठेव म्हणून जमा करण्याचे आदेश दिले. तर वकिलाने दाखल केलेला गुन्हा रद्द करण्याच्या याचिकेवरील सुनावणी सप्टेंबरपर्यंत तहकुब करत गुन्हा रद्द करण्याबाबतचा निर्णय पुढील वर्षी होईल असे न्यायालयाने स्पष्ट केले.

असा आहे प्रकार

संबंधित खटल्यातील वकिलाने १४ वर्षीय मुलीबरोबर लग्न केले. त्यावेळी तिचे वय केवळ १४ वर्षे होते आणि तो ५२ वर्षांचा होता. त्याने तिच्या आजी आजोबांना ६ एकर जमीन देत तिच्याशी लग्न केले होते. मात्र याला तिच्या वडीलांचा विरोध होता. विशेष म्हणजे वकीलाला लग्न केलेल्या मुलीच्या वयाएवढ्या वयाची मुलगीही आहे. याप्रकऱणी मुंबई पोलिसांनी काळा चौकी पोलीस ठाण्यात डिसेंबर २०१७ मध्ये त्याच्याविरोधात लैंगिक अत्याचार, शारीरिक अत्याचार आणि पॉस्को व बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला होता. त्याने याप्रकरणात १० महिने शिक्षाही भोगली आहे. त्यानंतर ती १८ वर्षांची झाली आहे. त्यामुळे वकिलाने तिच्या संमतीपत्रासह आपल्यावरील गुन्हा रद्द करण्याची मागणी करणारी याचिका न्यायालयात दाखल केली.