‘जानी दुश्मन’ उदयनराजे- रामराजे यांच्यात रंगल्या गप्पा !

सातारा : पोलीसनामा ऑनलाईन – साता-याचे खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje bhosale) आणि विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर (Ramraje Naik Nimbalkar ) यांच्यात मात्र टोकाचे मतभेद. ते निवडणुकीपुरते मर्यादित नाहीत, तर त्याही पलीकडे होते. पण शनिवारी यांच्यात समेट घडून आल्याचे चित्र पाहायला मिळाले. त्यामुळे राजकारणात कधीच कोणी कोणाचा कायमचा मित्र आणि शत्रू राहत नाही हे यावरून दिसून आले. साताऱ्यातील शासकीय विश्रामगृहावर हे दोन्ही नेते एकमेकांशी हास्यविनोद करत गप्पा (high-voltage-visit-satara) मारताना दिसले. कोरोनापासून काळजी घेण्याबाबतचा दोघांनी एकमेकांना सल्ला दिला. पण, मनातील खंत लपून राहिली नाही. दरम्यान, या दोन्ही नेत्यांच्या भेटीनंतर राजकीय चर्चांना उधाण आले आहे. दोघांनाही एकमेकांना भेटायचे होते, याच उद्देशाने ठरवून एकत्र आल्याची चर्चा सुरू झाली आहे. हीच भेट उदयनराजे- रामराजे यांच्या मैत्री पर्वाची नांदी ठरते की काय? असा तर्कदेखील राजकीय वर्तुळातून काढला जात आहे.

विधान परिषदेचे सभापती रामराजे आणि राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले हे दोन्ही नेते एकमेकांवर अनेक वर्षांपासून खार खाऊन आहेत. खासदार शरद पवार यांनी अनेकदा उदयनराजेंच्या बाजूने दिलेला कौल रामराजेंना पसंत पडला नव्हता. जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक असो अथवा लोकसभेची उमेदवारी यावरून रामराजे यांचा उदयनराजेंना कायमच विरोध पाहायला मिळाला. फलटणच्या राजकारणामध्ये रामराजे यांचे कट्टर विरोधक असलेले खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्याशी असलेली उदयनराजेंची मैत्री तर सर्वश्रूतच आहे. रणजितसिंह यांच्या मैत्रीखातर फलटणमध्ये जाऊन रामराजेंना आव्हान देण्याचे काम अनेकदा उदयनराजेंनी केलेले आहे. तर आज ज्या ठिकाणी या दोन्ही नेत्यांची बैठक झाली, त्या ठिकाणाहून पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दोन्ही नेते एकमेकांवर शेलक्या भाषेत टीका करत होते.

लोकसभेच्या पोटनिवडणुकीत देखील रामराजेंनी उदयनराजेंवर जोरदार टीकास्त्र सोडले होते. आता उदयनराजे भाजपमध्ये आहेत तर रामराजे राष्ट्रवादीत आहेत. मात्र एका पक्षात असताना मांडीला मांडी लावून न बसणारे हे दोन्ही नेते वेगवेगळ्या पक्षात असून देखील हास्यविनोदात गुंतलेले दिसले. रामराजे शासकीय विश्रामगृहावर एका कक्षात बसलेले होते. त्याचवेळी उदयनराजे देखील आपल्या निकटवर्तीय कार्यकर्त्याला भेटण्यासाठी विश्रामगृहावर आले. रामराजे देखील विश्रामगृहावर असल्याची माहिती मिळाल्यानंतर ते थेट रामराजे यांना भेटायला गेले. या ठिकाणी दोघांनी दिलखुलास गप्पा देखील मारल्या.

उदयनराजेंच्या गालावर हास्य.. रामराजेंचे मात्र मास्क
रामराजे- उदयनराजे एकमेकांशी गप्पा मारत असताना उदयनराजेंच्या गालावर खळीदार हास्य फुलले होते तर रामराजे यांच्या तोंडावर मास्क पाहायला मिळाले. मात्र गप्पा मारताना त्यांनी आपले मास्क उतरून ठेवले.