चिंता करू नये ! ‘कोरोना’ गेल्यानंतर गुणवत्ता दाखवण्यासाठी परीक्षेची व्यवस्था करू : उदय सामंत

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईन – महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमा भागातील मराठी नागरिकांना ताकद देण्यासाठी मराठी अभ्यासक्रम तातडीने सुरू आहे, अशी घोषणा राज्याचे उच्चशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी रविवारी (दि. 19) केली आहे. याचबरोबर महाराष्ट्र राज्यातील विद्यापीठांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबतही उदय सामंत यांनी मोठा खुलासा केला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यामधील सीमा भागात राज्य सरकार मराठी महाविद्यालय सुरू करणार आहे. शिवाजी विद्यापीठाच्या अंतर्गत हे महाविद्यालय सुरू करणार आहे, अशी माहिती उदय सामंत यांनी कोल्हापूर येथे दिली.

मुलांच्या पालकांनी चिंता करू नये. कोरोना विषाणू नियंत्रणात आल्यानंतर गुणवत्ता दाखवण्यासाठी आम्ही परीक्षेची व्यवस्था केली आहे. याबाबत लवकरच योग्य निर्णय घेतला जाईल, असेही उदय सामंत यांनी सांगितले आहे. राज्य सरकारला परीक्षा घ्यायच्या नाहीत, हा समज चुकीचा आहे. राज्य सरकारने दोनदा निर्णय घेतला होता. अंतिम वर्षाच्या परीक्षा आताच्या कोरोनाच्या परिस्थितीत शक्य नाही. त्यातही सप्टेंबर शेवटच्या आठवड्यात परीक्षा घेणेही शक्य नाही. अचानक कोरोना विषाणूचे संकट दूर होणार आहे का ? असा सवाल देखील उदय सामंत यांनी उपस्थित केला आहे. युजीसीने महाराष्ट्र राज्यातल्या सगळ्या विद्यापीठांचा आढावा घ्यावा. रेड झोनमधील विद्यार्थी कसे काय येऊन परीक्षा देतील ?, तेही युजीसीने सांगावे. राज्यातल्या सर्व कुलगुरू यांच्याशी चर्चा करून राज्य सरकारने परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रश्नपत्रिका तयार करणे, उत्तरपत्रिका तपासणे हे काम काय रोबोट करू शकणार नाहीत, असेही उदय सामंत यांनी यावेळी स्पष्ट केले.

उदय सामंत यांचे विनोद तावडे यांना प्रत्युत्तर
मी 60 जीआर काढून ते मागे घेतले नाहीत. मी एकच जीआर काढला आणि त्याच्या मागे लागलो. परीक्षांचे कुणीही राजकारण करू नये, विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न आहे, अशा शब्दांत उदय सामंत यांनी माजी शिक्षणमंत्री आणि भाजप नेते विनोद तावडे यांना प्रत्युत्तर दिले आहे.

भाजपचे परीक्षा घेण्यासाठीचे राजकारण…
महाराष्ट्र राज्यात कोरोनाबाधित रूग्णांची संख्या अधिक आहे. त्यामुळे या कालावधीत परीक्षा घेणे शक्य होणार आहे का?. सध्या परीक्षा देण्यासाठी विविध ठिकाणचे विद्यार्थी महाविद्यालयात कसे येतील? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यामुळे कोरोना विषाणू नियंत्रणात आल्यानंतर किंवा गेल्यानंतर राज्या सरकार परीक्षा घेण्यासंदर्भात विचार करणार आहे. तसेच त्याबाबत योग्य तो निर्णय घेणार आहे, असेही राज्याचे उच्चशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी सांगितले आहे. मात्र, भाजपकडून परीक्षा घेण्यासाठीचे राजकारण केले जात आहे. त्यात भाजप विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा योग्य विचार करत नाही, असे स्पष्ट होत आहे.