Coronavirus : दिलासादायक ! मुंबई आणि पुण्यातील ‘सर्वाधिक’ रुग्ण झाले बरे

मुंबई :  पोलीसनामा ऑनलाइन –  राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असून पुणे आणि मुंबईमध्ये धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. असे असले तरी सोमवारी (दि.4) दिवसभरात राज्यातील 350 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. आतापर्यंत एवढ्या मोठ्या संख्येने एकाच दिवशी रुग्णांना घरी सोडण्याची ही पहिलीच वेळ आहे. यामुळे उपचार करणाऱ्या आरोग्य यंत्रणेसोबत रुग्णांच्या नातेवाईकांना मोठा दिलासा आणि धीर मिळाला आहे. राज्यात सर्वाधिक मुंबई मंडळात 228 रुग्ण तर पुणे मंडळात 110 रुग्णांना घरी पाठवण्यात आले असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

सोमवारपर्यंत (दि.4) राज्यात एकूण 2465 कोरोना बाधीत रुग्ण बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मुंबई महापालिका क्षेत्रातील 165, ठाणे 3, ठाणे मनपा 11, नवी मुंबई मनपा 14, कल्याण-डोंबिवली मनपा 7, वसई-विरार मनपा 23, रायगड 3 तर पनवेल मनपा येथील 2 असे एकूण 228 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. तर पुणे मनपा 72, पिंपरी-चिचंवड मनपा 14, सोलापूर मनपा 22 तर सातारा येथील 2 असे पुणे मंडळात एकूण 110 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. त्याचप्रमाणे अमरावती मनपा 1, बुलढाणा 1, नागपूर मनपा क्षेत्रात 10 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे.

सध्या राज्यात एकूण 45 प्रयोगशाळा असून त्यापैकी 25 शासकीय आणि 20 खासगी प्रयोगशाळा आहेत. त्यांच्यामध्ये दररोज सात हजारापेक्षा जास्त चाचण्या करण्याची क्षमता आहे. कालपर्यंत राज्यात 2 लाख नमुन्यांपैकी 1 लाख 62 हजार नमुने निगेटिव्ह आले आहेत, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.