यवतमाळ : भरधाव कार दुभाजकावर धडकून दोघे ठार; दोघे गंभीर जखमी

यवतमाळ : पोलीसनामा ऑनलाइन – भरधाव कार दुभाजकावर धडकून झालेल्या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाला, तर दोघे गंभीर जखमी झाले. शुक्रवारी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास महामार्गावर ही घटना घडली. सर्वजण यवतमाळ येथील उज्लवनगर परिसरातील हेमंत अपार्टमेंटमध्ये राहणारे आहेत.

प्रवीण हिरामण शिरभाते (47), शुभम दत्तात्रय गादेवार (25) अशी मृतांची नावे आहेत, तर पंकज शहा व केतन वानोळे अशी जखमींची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, चौघेही मित्र शुक्रवारी रात्री दत्त चौकातील व्यापारी संकुलातील दुकानांची सफाई करून आर्णी रोडवरील हिवरीजवळ असलेल्या धाब्यावर जेवण करण्यासाठी गेले होते. रात्री उशिरा परत येत असताना किन्ही उड्डाण पुलाच्या खाली हा अपघात झाला. भरधाव कारने दुभाजकावर जोरदार धडक दिली. कार धडकेमुळे हवेत उसळली. कारचे इंजिन निखळून काही फूट अंतरापर्यंत जाऊन पडले. अपघातानंतर घटनास्थळावर मोठा आवाज झाला. तो ऐकून तेथील धाब्यावरील युवक बाहेर आले. अपघाताचे दृश्य पाहून त्यांचाही थरकाप उडाला. ग्रामीण पोलीस ठाण्याचे ठाणेदार करेवाड यांनी रात्री घटनास्थळी धाव घेतली. जखमींना शासकीय रुग्णालयात हलविले. रस्त्यावरील क्षतिग्रस्त वाहन, त्याचे सुटे भाग रात्रीच सुरक्षित ठिकाणी ठेवून वाहतूक सुरळीत करण्यात आली.