सोन्याला झळाली अन् चांदीही वधारली, जाणून घ्या आजचा दर

नवी दिल्लीः पोलीसनामा ऑनलाइन – गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या भावात सातत्याने चढउतार दिसून येत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव वधारल्याने भारतीय बाजारात सोमवारी (दि. 10) सोने-चांदी दरात वाढ झाली आहे. सोन्याच्या दरात सोमवारी प्रति 10 ग्रॅम 179 रुपयांनी वाढ झाली आहे. तर चांदीच्या दरात 826 रुपयांची वाढ झाली आहे.

दिल्ली सराफा बाजारात सोमवारी सोन्याचा नवा दर 47,452 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. याआधीच्या सत्रात सोन्याचा दर 47,273 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. तर आज चांदीचा दर 71,541 रुपये प्रति किलोग्रॅम इतका आहे. यापूर्वीच्या सत्रात चांदीचा भाव 70,715 रुपये प्रति किलोग्रॅम इतका होता. 2020 मधील सर्वोच्च स्तरावरुन सोने दर 9000 रुपयांच्या जवळपास कमी झाला आहे. त्यामुळे जर सोन्यात गुंतवणूक करायची असेल तर, आता चांगली संधी असल्याचे सांगितले जात आहे. 2021 च्या अखेरीस नफा कमावण्याची चांगली संधी मिळू शकते, असे जाणकाराचे म्हणणे आहे.

एचडीएफसी सिक्योरिटीजचे सिनियर एनालिस्ट तपन पटेल यांनी दिलेल्या माहितीनुसार, इतर चलनाच्या तुलनेत डॉलर कमकुवत झाल्याने गोल्ड रेटमध्ये तेजी आहे. अमेरिकी बाँड यील्डमध्येही घसरण झाल्याने याचा परिणाम सोने दरावर झाला आहे. न्यूयॉर्कच्या कमॉडिटी एक्सचेंजवरवर सोने दरात वाढ झाली. भारतीय बाजारावरही याचा परिणाम झाल्याने, सोने दरात वाढ झाल्याचे ते म्हणाले.