Hilsa Vidhan Sabha Seat Result 2020 : मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात फक्त 12 मतांनी JDU उमेदवाराचा विजय

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे मूळ जिल्हा नालंदा येथे हिलसा जागेवर (Hilsa Assembly Seat Result 2020) स्पर्धा अतिशय रंजक होती. ही जागा जद (यू) च्या खात्यात अवघ्या 12 मतांच्या फरकाने गेली. निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरील अपडेट माहितीनुसार, जद (यू) चे कृष्णा मुरारी शरण ऊर्फ प्रेम मुखिया यांना 61,848 मते मिळाली, तर जवळचे प्रतिस्पर्धी आरजेडीचे उमेदवार अत्री मुनी ऊर्फ शक्तीसिंग यादव यांना 61,836 मते मिळाली.

निवडणूक आयोगाने हिलसा जागेसाठी कॉलममध्ये लिहिले आहे की, ‘परिणाम घोषित’. तसेच विजयाचा फरक 12 मतांनी सांगितला गेला आहे. तत्पूर्वी, रात्री दहाच्या सुमारास हिलसा जागेवर मतमोजणी सुरू असताना आरजेडीने त्यावेळी झालेल्या मतमोजणीत गडबड असल्याचा आरोप केला होता.

पक्षाने ट्विट करून असा आरोप केला आहे की, “हिलसा विधानसभा मतदारसंघातील आरजेडीचे उमेदवार शक्तिसिंग यांना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी 547 मतांनी विजयी घोषित केले होते. त्यांना प्रमाणपत्र घेण्यासाठी वाट पाहण्यास सांगितले गेले. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी रिटर्निंग ऑफिसरचा फोन आला. मग अचानक अधिकाऱ्यांनी सांगितले की, पोस्टल मत रद्द झाल्यामुळे तुम्ही 13 मतांनी पराभूत झाले आहे. ” परंतु निवडणूक आयोगाने कुठूनही दबाव येण्याच्या आरोपाला नकार दिला आहे.