खेल रत्न पुरस्कारासाठी ‘गोल्डन गर्ल’ हिमा दासच्या नावाची शिफारस

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – साल २०१८ मध्ये दमदार कामगिरी करणारी गोल्डन गर्ल हिमा दास हिच्या नावाची शिफारस राजीव गांधी खेल रत्न पुरस्कारासाठी केली गेली आहे. आसामचे क्रीडा सचिव दुलाल चंद्रा दास यांनी क्रीडा मंत्रालयाला शिफारस केली आहे. हिमाने २०१८ मध्ये वीस वर्षांखालील जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. तसेच भालाफेकपटू नीरज चोप्रा, कुस्तीपटू विनेश फोगाट, टेबल टेनिसपटू मनिका बात्रा, महिला हॉकीपटू राणी रामपाल आणि क्रिकेटपटू रोहित शर्मा यांच्या नावाची देखील खेल रत्न पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे.

हिमाने जकार्ता येथे झालेल्या आशियाई स्पर्धेत ४०० मीटर शर्यतीत रौप्य आणि ४ बाय ४०० मीटर मिक्स रिले शर्यतीत सुवर्ण आणि ४ बाय ४०० मीटर रिले शर्यतीत सुवर्णपदक जिंकले होते. तसेच त्यानंतर २०१९ मध्ये देखील तिने उत्तम कामगिरी केली होती. हिमाला दोहा येथील जागतिक अजिंक्यपद स्पर्धेचे निमंत्रण आले होते, पण दुखापतीमुळे ती जाऊ शकली नाही. तसेच हिमाला २०१८ मध्ये अर्जुन पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले होते.