‘भाजप सत्तेसाठी कोणतीही तडजोड करतोय’, वरिष्ठ नेत्यानं व्यक्त केली खंत

पालमपूर : वृत्तसंस्था – भारतीय जनता पक्ष राजकीय प्रदुषणाचा बळी पडत आहे. ही केवळ सुरुवात आहे. राजकीय प्रदुषणाचा माझ्यासारख्या काही जणांना अतिशय त्रास होत आहे. आम्ही काम केलेला अन् वाढवलेला हाच भाजप आहे का, असे अनेकदा मनात येते, अशा शब्दांत भाजपच्या मार्गदर्शक मंडळाचे सदस्य तसेच वरिष्ठ नेते आणि हिमाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शांता कुमार यांनी पक्षाच्या आताच्या धोरणांवर हल्लाबोल केला. तसेच सत्तेसाठी भाजप कोणतीही तडजोड करतोय, अशी खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली.

शांता कुमार यांचे आत्मकथन असलेल्या निज पथ का अविचल पंथी या पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच झाले. त्यावेळी ते बोलत होते. आपल्या सिद्धांताशी कधीही तडजोड करता कामा नये, असा सल्ला शांता कुमार यांनी यावेळी पक्षाला दिला. भारतातील संपूर्ण राजकारण भरकटून दिशाहीन झाले आहे. सत्ता स्थापन करण्यासाठी तसेच विरोधकांना कमीपणा आणण्यासाठी दंगली घडवल्या जातात. नेत्यांची खरेदी-विक्री केली जात आहे. संपूर्ण देशात भ्रष्ट राजकारण सुरू असताना भाजपच केवळ शेवटचा आशेचा किरण असल्याचे मत शांता कुमार यांनी आपल्या पुस्तकात मांडले आहे. एक काळ होता, जेव्हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते भाजपची धोरणे आणि सिद्धांत यावर लक्ष ठेवून होते. भाजपने सिद्धांताशी तडजोड करू नये, यासाठी वेळोवेळी मार्गदर्शन करायचे. मात्र, हळूहळू संघाचे मार्गदर्शन कमी होत असल्याने एकूण परिस्थिती पाहता अतिशय चिंता वाटते, असे शांता कुमार यांनी म्हटले आहे.

दरम्यान 2014 मध्ये भाजपने प्रथमच ऐतिहासिक विजय प्राप्त केला. त्यानंतर मोदी लाटेमुळे पुन्हा एकदा 2019 मध्ये लोकसभा निवडणुकीत भाजपला मोठा विजय मिळाला. पंतप्रधान मोदी यांच्या रुपाने देशाला कुशल नेतृत्व लाभले. देशाने अनेक क्षेत्रात प्रगती केली, असे सांगत मोदी यांच्या मुसद्देगिरीचे शांता कुमार यांनी कौतुक केले आहे.