हुबळी : काश्मीरी विद्यार्थ्यांची देशविरोधी घोषणाबाजी, न्यायालयात नेताना लोकांकडून मारहाण

बंगळुरु : वृत्तसंस्था – कर्नाटकमधील हुबळी येथील केएलई अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकणाऱ्या 3 काश्मिरी विद्यार्थ्यांवर पाकिस्तानच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केल्याचा आरोप आहे. शुक्रवारी ज्यावेळी पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या सैनिकांना श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम सुरु होता त्यावेळी या विद्यार्थ्यांनी देशविरोधात घोषणा दिल्या. त्यांच्यावर कर्नाटक पोलिसांनी तात्काळ कारवाई करत त्यांना ताब्यात घेतले.

या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर संतप्त लोकांनी 3 विद्यार्थ्यांना न्यायालयात नेत असताना मारहाण केली. याप्रकरणी महाविद्यालयाचे प्राचार्य बसवराज अनामी यांनी पोलिसांकडे तक्रार केली असून या विद्यार्थ्यांना महाविद्यालयातून निलंबीत करण्यात येईल असे प्राचार्यांनी सांगितले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेले तीनही विद्यार्थी काश्मीरचे रहिवासी आहेत.

या तिघांनी पाकिस्तानवर लिहण्यात आलेले गाणे म्हणत पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या. हे गाणे सुरु होण्यापूर्वी बासित नावाच्या विद्यार्थ्यांने काश्मीरी भाषेत म्हटले की, माझे नाव बासित आहे आणि मी सोपोरचा रहिवासी आहे. हे माझे दोन मित्र आहेत अमीर आणि तालिब. आम्ही या ठिकाणी ठीक आहोत. इंशाअल्लाह ! तुम्ही पण त्या ठिकाणी ठीक असाल. काळजी करण्याची गरज नाही. यानंतर पाकिस्तानची प्रशंसा करत त्याने एक गाणे गाताना तो व्हिडीओत दिसत आहे. प्राथमिक तपासामध्ये हे तिन्ही विद्यार्थी शोपियांचे रहिवासी आहेत. महाविद्यालय व्यवस्थापनाने दिलेल्या तक्रारीवरून तिघांनाही अटक करण्यात आली असल्याचे पोलिसांनी सांगितले.

हुबळी – धारवाडचे पोलीस आयुक्त आर. दिलीप म्हणाले की, आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार या विद्यार्थ्यांनी पाकिस्तानच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली होती. त्यांनी त्याचा व्हिडिओ व्हायरलही केला होता. गोकुळ रोड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षकांचे एक पथक तात्काळ केएलई महाविद्यालयात पाठवण्यात आले. या पथकाने 3 विद्यार्थ्यांना अटक केली.

व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आज हिंदू संघटनांनी याचा निषेध केला. पोलीस या तीन विद्यार्थ्यांना अटक करून घेऊन जात असताना निदर्शने करणाऱ्या काही लोकांनी त्यांच्यावर हल्ला केला. विद्यार्थ्यांना यावेळी मारहाण करण्यात आली. या प्रकरणाचा पोलीस तपास करत असून अटक करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.