‘राष्ट्रीयत्व’ या मुद्यावरून हिंदू समाज नपूंसक, संभाजी भिडेंचे ‘वादग्रस्त’ विधान

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रीयत्वाच्या मुद्द्याबाबत हिंदू समाज नपुंसक आहे असे वादग्रस्त वक्तव्य शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी केले आहे. नागरिकत्व सुधारणा कायदा (CAA) आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (NRC) कायद्याच्या समर्थनार्थ शिवप्रतिष्ठानच्यावतीने सोमवारी (दि.30) सांगलीत मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चा संदर्भात माहिती देण्यासाठी संभाजी भिडे यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. त्यावेळी त्यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केले आहे.

सुधारित नागरिकत्व कायदा हा देशाला बळ देणारा कायदा असल्याचे मत त्यांनी यावेळी स्पष्ट केले. जगातल्या 187 देशांमध्ये नागरिकत्वासंबंधीचा कायदा आहे. मग भारतात हा कायदा का नको ? सीएएला विरोध करणारे लोक देशाची दिशाभूल करत आहेत. ममता बॅनर्जी यांनी या कायद्याची मागणी केली होती. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी हा कायदा आणला होता. आता हेच लोक या कायद्याला विरोध दर्शवत आहेत. ही बाब आश्चर्यकारक आहे, असेही संभाजी भिडे यांनी म्हटले आहे.

चार दिवसांपूर्वीच संभाजी भिडे यांनी सुधारित नागरिकत्व कायद्याला विरोध करणारे देशद्रोही आहेत असं वक्तव्य केले होते. आपला देश माणसांचा आहे, पण देशभक्तांचा नाही हे दुर्दैवी आहे. स्वार्थ हाच धर्म असणारे कायद्याला विरोध करत आहेत. या कायद्यामुळे काश्मीरपासून ते कन्याकुमारीपर्यंत प्रत्येक भारतीयाला आनंद झाला पाहिजे. देशभक्त असणारा प्रत्येक नागरिक या कायद्याचं समर्थन करेल. याला विरोध करणारे देशद्रोही आहेत, असे वक्तव्य संभाजी भिडे यांनी केले होते. आजच्या पत्रकार परिषदेत त्यांनी याच मुद्यावर भाष्य केले आहे.

फेसबुक पेज लाईक कराhttps://www.facebook.com/policenama/