आंतरराष्ट्रीय हिंदु महासभा अध्यक्ष रंजीत बच्चन यांची गोळ्या घालून भररस्त्यात हत्या

मॉर्निग वॉकसाठी पडले होते घरातून बाहेर

लखनऊ : वृत्तसंस्था – आंतरराष्ट्रीय हिंदु महासभेचे अध्यक्ष रंजीत बच्चन यांची रविवारी सकाळी भररस्त्यात गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेल्या रंजीत बच्चन यांच्यावर बाईकवरुन आलेल्यांनी गोळ्या झाडल्या. डोक्यात गोळी शिरल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

पोलिसांनी सांगितले की, रंजीत बच्चन हजरतगंजमधील ओसीआर बिल्डिंगमध्ये रहात होते. ते मुळचे गोरखपूरचे राहणारे होते. समाजवादी पार्टीचे सांस्कृतिक कार्यक्रम ते करत असत. रंजीत बच्चन हे आपले मित्र आशीष श्रीवास्तव यांच्या बरोबर सकाळी साडेसहा वाजता मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडले होते. ग्लोब पार्कमधून बाहेर आल्यावर बाईकवरील गुंडांनी त्यांच्या डोक्यात गोळी झाडून त्यांची हत्या केली. या हल्ल्यात त्यांचे मित्र आशीष हेही जखमी झाले असून त्यांच्यावर ट्रामा सेंटरमध्ये उपचार करण्यात येत आहे. या हत्येमागचे कारण अद्याप समजू शकले नाही.

गेल्या वर्षीही हिंदुवादी नेता कमलेश तिवारी यांच्या घरात शिरुन हत्या करण्यात आली होती. त्यानंतर आता रंजीत बच्चन यांची हत्या झाल्याचे यामागील नेमके कारण काय असा प्रश्न उभा राहिला आहे.