‘ना हिंदू – ना मुस्लिम संकटात’, फक्त ‘त्या’ हरामखोरांच्या खुर्च्या धोक्यात : रविकांत तुपकर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – देशात सध्या सुरू असलेल्या धार्मिक द्वेषाच्या राजकारणावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर यांनी सडेतोड भाष्य केले आहे. हिंदू – मुस्लीम गावपातळीवर सुद्धा एकोप्याने रहात आहेत. असे असूनही काही राजकारणी हिंदू खतरे में, मुस्लीम खतरे में म्हणत आपली राजकीय पोळी शेकून घेत असल्याचे तुपकर यांनी आपल्या आक्रमक भाषेत निदर्शनास आणून दिले. ते जळगाव जामोद येथे आयोजित क्रांती मोर्चात बोलत होते.

हरामखोरांच्या खुर्च्या धोक्यात
क्राती मोर्चाला संबोधित करताना तुपकर म्हणाले, निवडणुका येताच राजकीय नेते धर्म संकटात असल्याचा प्रचार करतात. दिल्लीतून कुणीतरी म्हणतो हिंदू संकटात आहे. तर लगेच मुंबईतून दुसरा म्हणतो मुस्लीम धोक्यात आहे. परंतु, आम्ही सर्वधर्मीय एकाच हॉटेलमध्ये एकत्र जेवेतो, एकत्र राहतो. दोन्ही समाजातील लोक एकमेकांच्या सणात सहभागी होतात. त्यामुळे ना हिंदू संकटात आहे, ना मुस्लीम धोक्यात आहे. परंतु या हरामखोरांच्या खुर्च्या धोक्यात आहेत, असे तुपकर म्हणाले.

किती शेतकर्‍यांच्या मुलांना नोकर्‍या दिल्या
भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना रविकांत तुपकर म्हणाले, भाजपने लोकांना मोठमोठी स्वप्न दाखवली. शेतकरी आत्महत्या थांबवू, शेतकर्‍यांना दीडपट भाव देऊ, शेतकर्‍यांचे कर्जमाफ करू, अशी अश्वासने निवडणुकीदरम्यान मोदी यांनी आपल्या भाषणात दिली. परंतु, सत्तेत आल्यावर मोदींनी किती शेतकर्‍यांच्या मुलांना नोकर्‍या दिल्या, असा सवाल करत त्यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला.