हिंगणघाट जळीत प्रकरण : त्याला तिथंच जाळा, पिडीतेच्या आईचा ‘आक्रोश’

हिंगणघाट : पोलीसनामा ऑनलाइन – हिंगणघाट जळीत प्रकरणातील पीडित शिक्षिकेची मृत्यूशी झुंज सुरु आहे, तिची प्रकृती नाजूक असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले. तिच्या चेहऱ्यांचा कोळसा झालेला आहे. शिक्षिका सध्या कृत्रिम श्वासोच्छवासावर आहे. माझ्या मुलीची ही अवस्था करणाऱ्याला जिवंत जाळा, त्याला ही तशाच वेदना द्या असा संताप पीडितेच्या आईने व्यक्त केला.

या प्रकरणातील आरोपी विकेश नगराळे याला तात्काळ फाशी द्या अशी मागणी वर्ध्यात संतप्त नागरिकांनी प्रांत कार्यालयावर काढलेल्या मोर्चातून केली. या मोर्चात शेकडो नागरिक सहभागी झाले होते.

हिंगणघाट येथील नंदोरी चौकात अंगावर पेट्रोल ओतून या शिक्षिकेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न करणारा आरोपी विकेश नगराळे याला आज न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने आरोपीला 8 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

मुख्यमंत्री सहायत्ता निधीतून मदत –
मृत्यूशी झुंज देणाऱ्या या पीडितेवर नागपूरमध्ये एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या पीडितेला मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत दिली जाईल अशी माहिती राज्याचे सार्वजनिक मंत्री राजेश टोपे यांनी दिली.