हिंगणघाट जळीत प्रकरण : डॉक्टरांनी व्यक्त केली ‘ही’ भीती, जारी केलं पीडित युवतीचं मेडिकल ‘बुलेटिन’

वर्धा : पोलीसनामा ऑनलाइन – औरंगाबाद येथील जळीतकांडात जखमी झालेल्या मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्या युवतीच्या मृत्यूमुळे संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली. ही घटना सिल्लोड मधील अंधारी गावातील आहे. तर दुसऱ्या बाजूला हिंगणघाट येथील पीडित प्राध्यापिका अजूनही मृत्यूशी झुंज देत आहे. तिचा वैद्यकीय चाचण्यांचा अहवाल प्रसिद्ध झाला असून तिची प्रकृती चिंताजनक आहे. तिला इन्फेक्शन होण्याची शक्यता आहे. तिच्यावर शुक्रवारी सर्जरी करण्यात येणार असून ती अजून उपचारांना म्हणावा तसा प्रतिसाद देत नाही, असे डॉ. दर्शन रेवनवार यांनी स्पष्ट केले.

डॉ. राजेश अटल यांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्जरी केल्यामुळे कॉम्प्लिकेशन वाढून रुग्णाला होणारा त्रास वाढू शकतो. शुक्रवारी तिचे ड्रेसिंग करण्यात येणार असून प्रोटीनचे नुकसान होऊ नये म्हणून औषधे देण्यात येणार आहेत. शरीर जळाल्यामुळे संसर्ग होण्याचा अंदाज असून, फुफ्फुसात संसर्ग झाला आहे आणि हृदयाची गती सुद्धा वाढली आहे. तिची सर्वतोपरीने काळजी घेत असल्याचे डॉक्टर अटल यांनी सांगितले. तिच्यासाठी खास वेगळे आयसीयू युनिट तयार करण्यात आले असून, तिच्या काळजीसाठी विशेष नर्स ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे तिला भेटण्यासाठी कोणीही जाऊ नये असे आवाहन देखील डॉ. अनुप मरार यांनी केलेय.

लागोपाठच्या जळीतकांडामुळे आज वर्धा बंद चे आवाहन 

औरंगाबाद आणि हिंगणघाट येथील जळीत प्रकरणाचा निषेध म्हणून आज वर्धा शहरात सर्वपक्षीय बंद पाळला जाणार आहे. सर्व कार्यालये, महाविद्यालये, शाळा आज बंद राहणार असून आज सर्व नागरिक याविरुद्ध रस्त्यावर उतरणार आहेत.

औरंगाबाद येथील पीडितेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून या घटनेत ती जवळजवळ 95 % भाजली होती. तिला बिअर मालकाने घरात घुसून जाळले होते. तिच्यावर घाटी रुग्णायालयात उपचार सुरू होते, परंतु तिची मृत्युसोबत चाललेली झुंज अपयशी ठरली.