हिंगणघाट घटनेतील नराधामाचं हैदराबादसारखं काही तरी करा : प्रणिती शिंदे

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – विदर्भातील हिंगणघाट येथे एकतर्फी प्रेमातून एका प्राध्यापिकेला जाळण्याचा प्रकार अतिशय संतापजनक असून या प्रकरणी अटकेत असलेल्या नराधमाला पोलीस तपासासह अन्य कायदेशीर बाबींमध्ये विलंब न लावता जलदगतीने शिक्षा होण्याच्या दृष्टीने शासनाने पावले उचलावीत. किंवा हैदराबादसारख काही तरी करा अशी मागणी काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी केली आहे. सोलापूर युवक काँग्रेसच्या वतीने या घटनेच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. त्यावेळी त्या बोलत होत्या.

राज्यात व देशात अनेक ठिकाणी एकतर्फी प्रेमातून नराधमांकडून तरुणीच्या जिवावर उठण्याचे प्रकार घडत असल्याबद्दल त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. त्या म्हणाल्या, माथेफिरू, नराधमांना कायद्याविषयीची भीतीच उरली नसल्याचे अशा वारंवार घडणाऱ्या घटनांवरून दिसून येते. हिंगणघाटातील घटनेनंतर संबंधित नराधम तरुण जागेवरच पकडला गेला आहे. खरे तर तरुणीवर अशा प्रकारचे प्राणघातक हल्ले होतात तेव्हा फिर्याद नोंदविण्याच्या प्रक्रियेसह कायदेशीर तपास व अन्य बाबींची वाट न पाहता मारेकऱ्यांना तात्काळ शिक्षा होण्यासाठी कठोर पावले उचलली गेली पाहिजेत, अशी मागणी त्यांनी केली.

हैदराबाद मधील डॉक्टरवर बलात्कार करुन तिला जाळून टाकणारे नराधम पोलीस एन्काऊंटरमध्ये मारले गेले होते. गुन्हा घडला त्याच ठिकाणी पोलिसांशी झालेल्या चकमकीत ते मारले गेले. ही चकमक बनावट असल्याचे आरोपही झाले होते. मात्र, सर्वसामान्यांकडून पोलिसांच्या कारवाईला मोठा पाठिंबा मिळाला होता.