हिंगणघाट पिडीतेचा खटला ‘फास्ट ट्रॅक’मध्ये, उज्वल निकम चालवणार खटला

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – हिंगणघाट येथील भरचौकात पेट्रोल टाकून पेटविलेल्या प्राध्यापक तरुणीचे प्राण वाचविण्यात डॉक्टरांना यश आले आहे. हा खटला ज्येष्ठ विधीज्ञ उज्वल निकम लढवतील, अशी घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी येथे केली आहे.

हिंगणघाट येथील जळीतकांडातील पिडिता नागपूरमधील रुग्णालयात मृत्युशी झुंज देत आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मंगळवारी रात्री रुग्णालयाला भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत नॅशनल बर्न सेंटरचे डॉ. सुनिल केशवानी, ऑरेंज सिटी हॉस्पिटलचे संचालक डॉ. अनुप मरार होते.

यावेळी देशमुख यांनी सांगितले की, आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देण्यासाठी तिच्या वडिलांच्या मागणीनुसार अ‍ॅड. उज्वल निकम यांच्याकडे ही केस सुपूर्त केली जाईल. सोबतच या खटल्याचा लवकरात लवकर निकाल लागण्यासाठी फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये हे प्रकरण चालविण्याचा प्रयत्न केला जाईल. पिडित तरुणीच्या आरोग्याचा पूर्ण खर्च सरकार उचलणार आहे. अशा घटना होऊ नये, यासाठी आंध्र प्रदेशातील कायदा महाराष्ट्रात लागू करण्यावर अभ्यास केला जाईल, असे देशमुख यांनी सांगितले.

डॉ. केशवानी यांनी सांगितले की, तरुणीचे प्राण वाचविण्यात डॉक्टरांना यश आले आहे. तिची श्वसन नलिका व फुफ्फुस डॅमेज झालेले आहेत. त्यामुळे तिची प्रकृती नाजुुक आहे. पुढील ७ दिवस तिच्यासाठी महत्वाचे आहेत.