हिंगोली : खाजगी इसमामार्फत लाच स्वीकारणाऱ्या मंडळाधिकाऱ्यास एसीबीच्या पथकाने पकडले

हिंगोली : पोलीसनामा ऑनलाइन – वाळूची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई न करण्यासाठी कळमनुरीच्या मंडळ अधिकारी उत्तम डाखोरे याला खाजगी इसमामार्फत तीस हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ८ जून रोजी दुपारी पकडले.

मंडळ अधिकारी उत्तम डाखोरे व तलाठी पाखरे याने तक्रारदाराचे ट्रॅक्टर पकडले होते. वाळूची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई न करण्यासाठी मंडळ अधिकारी उत्तम डाखोरे याने तीस हजारांच्या लाचेची मागणी केली. तक्रारकर्त्याने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे संपर्क करून तक्रार दाखल केली. सोमवारी लाच देण्याचे ठरले. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला. कळमनुरी बसस्थानकासमोर खाजगी इसम सुनील शिंदे यास लाच घेताना पकडले. डाखोरेच्या सांगण्यावरून त्याने ही लाच घेतली होती.

याबाबत कळमनुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. लाचलुचपतचे पोलीस उपाधीक्षक हनुमंत गायकवाड, पोनि नितीन देशमुख, पोनि ममता अफुने, संभाजी बुरकुले, सुभाष आढाव, अभिमन्यू कांदे, विजय उपरे, तान्हाजी मुंडे, ज्ञानेश्वर पंचलिगे, विनोद देशमुख, प्रमोद थोरात, सरनाईक आदींच्या पथकाने ही कारवाई केली. शिंदे व डाखोरे या दोघांनाही ताब्यात घेतले.