Coronavirus : चिंताजनक ! हिंगोली जिल्ह्याची वाटचाल 100 च्या दिशेने, एका रात्रीत 23 जण ‘कोरोना’ पॉझिटिव्ह

हिंगोली : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्यात दिवसेंदिवस लक्षणीय वाढ हेत असून हिंगोलीतील कोरोना बाधितांची संख्या शंभरीच्या जवळ पोहचली आहे. हिंगोलीत सोमवारी (दि.4) मध्यरात्री 23 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये 22 जवान आणि एका परिचारिकेचा समावेश आहे. हिंगोली येथील राज्य राखीव बलातील बंदोबस्ताहून आलेल्या 36 जवान आणि जिल्हा सामान्य रुग्णालय, हिंगोली येथे कार्यरत एक परिचारिका असे एकूण 37 जणांना कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे.

दरम्यान, आज (मंगळवार) सकाळी पुन्हा 14 जवानांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने कोरोनाचा संसर्ग झालेल्या जवानांची संख्या 36 झाली आहे. सोमवारी 14 जवानांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे. हिंगोली येथे राज्य राखीव बलातील एकुण 83 जवानांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले असून यामध्ये राज्य राखीव बल, जालना येथे कार्यरत असलेल्या एका जवानांचा समावेश आहे. त्यातील 35 जवान हे मालेगाव तर 48 जवान हे मुंबई येथे बंदोबस्तासाठी कार्यरत होते.

जालना राज्य राखीव बल येथील जवानाच्या संपर्कात आलेल्या दोन व्यक्ती, सेनगाव येथील 1 बालक, बार्शी येथून वसमत येथे आलेला 1 व्यक्ती आणि सेनगाव येथील रुग्णांच्या संपर्कात आल्याने 1 रुग्ण आणि जिल्हा सामान्य रुग्णालय, हिंगोली येथे कार्यरत 24 वर्षीय परिचारिका असे एकूण 89 कोरोनाबाधित रुग्ण आहेत. अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किशोर श्रीवास यांनी दिली. या सर्व रुग्णांवर तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत औषधोपचार करण्यात येत असुन, सर्वांची प्रकृती स्थिर आहे.