हिंगोलीत ऑनलाईन फसवणूक ! सायबर सेलच्या सतर्कतेमुळे रोकड परत

हिंगोली : पोलीसनामा ऑनलाइन – बँक खात्याविषयी माहिती विचारून अनेकांची फसवणूक केली जात आहे. ऑनलाईन फसवणूकीच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होत आहे. अशीच एक घटना हिंगोली शहरात घडली. मात्र सायबर सेलच्या तत्परतेमुळे संबंधित व्यक्तीस त्याची रोकड परत मिळाली आहे.
हिंगोली शहरातील दिनेश चौधरी यांना मोबाईलवर फोनद्वारे युनियन बँक हिंगोली या शाखेतील खात्याविषयी माहिती विचारण्यात आली. त्यांच्याकडून ओटीपी नंबर घेत परस्पर १० हजारांचे दोन ट्रँजेक्शन असे एकूण २० हजार रूपयांची रोकड वळती करण्यात आली. त्यामुळे चौधरी यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली.

तक्रार दाखल होताच पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांनी याबाबात सायबर सेलचे पोलीस निरीक्षक जगदीश भंडरवार यांना तात्काळ कारवाईच्या सूचना दिल्या. त्यानुसार पोनि भंडरवार यांच्या मार्गदर्शनाखाली निलेश हलगे, जयप्रकाश झाडे, यांनी तक्रारदाराच्या बँक खात्याचे स्टेटमेंट व प्राप्त एसएमएसची पडताळणी केली.

यावेळी सदर रक्कम मोबीक्वीक पेमेंट अ‍ॅप्लीकेशनच्या माध्यमातून गेल्याचे कळाले. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ मोबीक्वीक पेमेंट अ‍ॅप्लीकेशनच्या नोडल अधिकाऱ्यांशी संपर्क करून सदरील व्यवहार हा फसवणूकीचा आहे, असे लक्षात आणुन देत हा व्यवहार तात्काळ थांबविण्यास सांगितला. त्यामुळे सदरची फवणूक झालेली २० हजारांची रक्कम परत तक्रारदार दिनेश चौधरी यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात हिंगोली सायबर सेलला यश आले. त्यामुळे नागरिकांनी दक्ष रहावे, कोणालाही बँक खात्याविषयी माहिती देऊ नये, असा प्रकार घडत असल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क करावा असे आवाहन पोनि भंडरवार यांनी केले आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, पोनि जगदीश भंडरवार यांच्या सूचनेनुसार निलेश हलगे, जयप्रकाश झाडे, इरफान पठाण, सुमीत टाले, रोहित मुदीराज, रमा ठोके आदींनी केली.