तंबाखू खाऊन थुंकणे बेतले जीवावर ; तरुणाकडून एकाचा खुन

हिंगोली : पोलीसनामा ऑनलाईन – तंबाखू, गुटखा खाऊन कुठेही थुंकण्याची सवय अनेकांना असते पण हिंगोली इथल्या एका तरुणाला ही सवय जीवावर बेतली आहे. हिंगोली इथल्या कळमनुरी तालुक्यातील शेवाळा येथे तंबाखूची थुंकी अंगावर पडल्याने तरुणाने एकाची हत्या केल्याची घटना घडली आहे. ज्ञानेश्वर कुंभकर्ण असे या आरोपीचे नाव असून तो मनोरुग्ण असल्याचे पोलिसांनी संगितले आहे. त्याला पुण्यातील येरवडा इथल्या रुग्णालयात पाठवण्यात येणार असल्याचे देखील पोलिसांनी संगितले आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, शेवाळा येथील बसवेश्वर चौकात पेव्हर ब्लॉक बसवण्याचे काम चालू होते. या कामावर सय्यद अफसर सय्यद रसूल आणि ज्ञानेश्वर कुंभकर्ण हे दोघे मजूर काम करत होते. यावेळी सय्यद अफसर तंबाखू खाऊन थुंकला. त्यावेळी थुंकी ज्ञानेश्वर कुंभकर्णच्या अंगावर पडली. या रागात ज्ञानेश्वरने सय्यदच्या डोक्यात फावडा मारला, ज्यात सय्यद अफसर गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी प्रथम आखाडा बाळापूर इथल्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं. परंतु नंतर नांदेडला हलवण्यात आलं, मात्र तिथे त्यांचा मृत्यू झाला. या घटनेने हिंगोलीत सर्वत्र खळबळ उडाली आहे.