भानामतीच्या संशयातून निर्घृण खून, रक्ताने माखलेल्या कपड्यावरच झोपला आरोपी

हिंगोली : पोलीसनामा ऑनलाइन – हिंगोली जिल्ह्यातील पारडा येथे भानामतीच्या संशयातून एकाचा निर्घृण खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी दोघांना अटक केली आहे तर एक जण फरार झाला आहे. शंकर साधू अलझेंडे (वय-55) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. बासंबा पोलिसांनी शुक्रवारी रात्री खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली. पोलीस आरोपीला पकडण्यासाठी गेले त्यावेळी एक आरोपी पळून जाण्याच्या तयारीत होता. तर एक आरोपी रक्ताने माखलेल्या कपड्यानिशी घरात झोपला होता.

नागनाथ किरण गोविंदपुरे आणि संतोष तोडकर अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर बाळू उर्फ सिद्धेश्वर तोडकर हा फरार झाला आहे. पोलिसांनी भानामतीचा संशय व्यक्त केला आहे. नवनाथ याची पत्नी मागील अनेक दिवसांपासून आजारी आहे. तिच्यावर औषधोपचार केले मात्र तिच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत नव्हती. त्यांच्या घराशेजारी राहणारे शंकर अलझेंडे याने भानामती केल्याचा संशय आरोपींना होता. त्यामुळे तिघांनी मारहाण करून त्यांचा खून केल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मयत शंकर अलझेंडे हे घरामध्ये एकटेच राहतात. त्यांचे कुटुंबीय कामाच्या शोधात बाहेरगावी गेले आहेत. गुरुवारी रात्री साडेनऊच्या सुमारास आरोपींनी अलझेंडे यांना घरातून बाहेर बोलावून घेत लोखंडी सळई आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या मारहाणीत अलझेंडे यांच्या किडनीला मार लागल्याने पोटात रक्तस्त्राव झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवल्यानंतर आरोपींचा शोध सुरु केला. त्यावेळी आरोपींची माहिती मिळाली. आरोपी नागनाथ हा पहाटे तीनच्या सुमारास बॅग भरून पळून जाण्याच्या तयारीत होता. तर संतोष हा रक्ताने माखलेल्या कपड्यानिशी घरात झोपला होता. पुढील तपास बसंबा पोलीस करीत आहेत.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like