हाफ चड्डी घालणारा चालक म्हणाला – ‘मी RDC, माझी गाडी थांबवायची तुझी हिम्मत कशी झाली बे’, PSI कडून निवासी उपजिल्हाधिकार्‍याविरूध्द FIR

हिंगोली : पोलीसनामा ऑनलाइन – प्रशासनातील ज्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कायद्याची अंमलबजावणी करून घेण्याची जबाबदारी शासनाने सोपवली आहे, ते कशा प्रकारे नियम पायदुळी तुडवतात याचा गंभीर प्रकार हिंगोलीत पहायला मिळाला. आर.डी सुर्यंवंशी या उपजिल्हाधिकाऱ्यांने चक्क आपल्या खासगी वाहनावर अंबर दिवा लावून शहरात फेरफटका मारला. पोलिसांनी गाडी अडवून चौकशी केली असता त्यांनी पोलिसांनाच डाफरत तू मला कायदा शिकवणार का ? असे म्हणत आरेरावी केली. या मुजोर उपजिल्हाधिकाऱ्यावर हिंगोली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक साईनाथ भुमन्ना अनमोड (वय-31) यांनी हिंगोली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलीस उपनिरीक्षक साईनाथ अनमोडे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मी आपल्या सहकाऱ्यांसह सकाळी 8 पासून शहरातील इंदिरा चौक तपासणी पॉईंटवर कार्यरत होतो. दुपारी साधरणत: 11.50 च्या सुमारास अकोला बायपासकडून एमएच 23 एएस 7223 ही चारचाकी गाडी येत होती. गाडीवर अंबर दिवा लावल्याचे निदर्शनास आल्यामुळे मी गाडी थांबवली व चालकाकडे चौकशी केली. गाडी चालवणारा चालक हाफ चड्डी घालून बसले होत. गाडी सरकारी आहे की खासगी असा प्रश्न विचारला असता गाडी खासगी आहे आणि मी आरडीसी आहे, माझी गाडी थांबवायची तुझी हिंमत कशी झाली बे, अशी भाषा त्यांनी वापरली. खासगी वाहनावर अंबर दिवा लावता येत नाही, गाडी पोलीस स्टेशनला घ्या, असे सांगितले असता तेव्हा त्यांनी थांब तुझ्या एसपीलाच फोन लावतो, असे म्हणत फोन लावून माझ्यावर कोणाशी तरी बोलण्याबाबत दबाव टाकला. पण मी बोलण्यास नकार दिला व सहकारी कॉस्टेबलला गाडीत बसा आणि पोलीस स्टेशला या असे सांगितले.

माझे सहकारी गाडीचा दरवाजा उघडण्यासाठी गेले, तर आबे साल्या माझ्या गाडीचा दरवाजा सोड, गाडी कुठे घ्यायची ते सांग मी घेतो, अबे साल्या आता तुला दाखवतोच असे म्हणत धमकावले. कॉन्स्टेबलला गाडीत बसून मी माझ्या गाडीने पोलीस ठाण्यात आलो. त्यानंतर पोलीस निरीक्षक सय्यद साहेब यांच्या केबिनमध्ये आरडीसी यांनी पुन्हा साहेबां समक्ष तुझी काय औकात बे माझी गाडी पकडायची, तु मला कायदा शिकवणार का ? असे म्हणत आरेरावीची भाषा वापरली, अश्लिल शिवीगाळही केली. त्यानंतर आम्ही या घटनेची सविस्तर नोंद घेतली, आमच्यानंतर पोलीस उपअधिक्षक जगताप मॅडम यांनीही रितसर नोंद घेतली. त्यानंतर आम्हाला समजले की, सदर व्यक्ती ही उपजिल्हाधिकारी सुर्यवंशी आहे.
वरिष्ठांकडून मिटवून घेण्याचा सल्ला अप्पर पोलीस अधिक्षक काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी वैजने या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सदर प्रकरण मिटवून घ्या, असे मला सांगितल्याचे अनमोड यांनी तक्रारीत नमूद केले आहे. तसेच उपजिल्हाधिकारी सुर्यवंशी यांच्यावर कोणतीही दंडात्मक कारवाई न करता त्यांना सोडून दिले. उपजिल्हाधिकारी हे त्यावेळी कर्तव्यावार नव्हते, ते हाफ चड्डीवर गाडी चालवत होते, पोलीस स्टेशनच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये हे सगळे आहे.

अखेर गुन्हा दाखल
अनमोड याच्या तक्रारीची हिंगोली शहर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली. मात्र त्यावर रात्री उशीरापर्यंत कोणतीच कारवाई करण्यात आलेली नव्हती. अखेर साईनाथ अनमोडे यांच्या तक्रारीवरून उपजिल्हाधिकारी आर.डी. सुर्यवंशी यांच्यावर हिंगोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.