दुर्देवी ! हिंगोलीत पोहण्यासाठी गेलेल्या 3 युवकांचा धरणात बुडून मृत्यू

हिंगोली : पोलीसनामा ऑनलाइन –  धरणाच्या पाण्यात पोहण्यासाठी गेलेल्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज (रविवार) दुपारी अडीचच्या सुमारास घडली. ही घटना हिंगोली तालुक्यातील मोरगव्हाण येथील ईसापूर धरणामध्ये घडली. तर त्यांच्यासोबत असलेले इतर दोन तरुण बचावले आहे. तीन तरुणांच्या मृत्यूच्या घटनेमुळे हिंगोली शहरासह जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.

हिंगोली शहरातील 20 ते 25 वयोगटातील 5 तरूण कळमनुरी तालुक्यातील मोरगव्हाण-ईसापूर धरणाच्या बॅक वॉटर क्षेत्रात पोहण्यासाठी आज दुपारी अडीचच्या सुमारास गेले होते. धरणात पोहत असताना पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. योगेश बालाजी गडप्पा (वय-20 रा. बियाणीनगर, हिंगोली), शिवम सुधीर चोंढेकर (वय-21 रा. भट्ट कॉलनी, हिंगोली), रोहित अनिल चिंत्तेवार (वय -23 रा. पोस्ट ऑफीस रोड हिंगोली) असे पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या तीन तरुणाची नावे आहेत. तर निखील नागोराव बोलके आणि श्रीकांत संजीव चोंढेकर असे बचावलेल्या दोघांची नावे आहेत.

धरणाच्या पाण्यात पोहण्यासाठी पाचजण उतरले होते. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने योगेश, शिवम आणि रोहित हे तिघेजण पाण्यात बुडाले. ते तिघे बुडत असल्याचे पाहून निखील आणि श्रीकांत यांनी पाण्याबाहेर येऊन आरडाओरडा केला. मोरगव्हाण परिसरातील शेतकरी व नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी या घटनेची माहिती कळमनुरी पोलिसांना दिली. पोलीस निरीक्षक रणजित भोईट, ज्ञानोबा मुलगीर आणि त्यांचे पथक तसेच नायब तहसीलदार श्रीराम पाचपुते, मंडळ अधिकारी यु.आर. डाखोरे घटनास्थळी दाखल झाले.

कळमनुरी येथील शिवसेनेचे कांता पाटील, बब्बर पठाण, आप्पा कदम, योगेश कांबळे यांच्यासह नागरिक व पोलिसांनी या तरुणांचा शोध घेतल्यानंतर योगेश गडाप्पा, शिवम चोंढेकर, रोहित चिंचेवार यांचे मृतदेह एका तासांच्या प्रयत्नानंतर बाहेर काढले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून दिले. दरम्यान, तिघे तरूण हे जिल्हा प्रशासनातील कर्मचाऱ्यांची मुले असून या घटनेमुळे हिंगोली शहरात हळहळ व्यक्त होत आहे.