Hinjewadi : वाढदिवसाचा फ्लेक्स काढल्याच्या रागातून टोळक्याकडून ग्रामपंचायत कर्मचाऱ्यास मारहाण

हिंजवडी (पुणे) : पोलीसनामा ऑनलाइन – वाढदिवसाचा फ्लेक्स काढल्याच्या रागातून ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला पाच जणांच्या टोळक्याने दगडाने बेदम मारहाण केल्याची घटना बावधन बुद्रुक येथे घडली आहे. ही घटना शुक्रवारी (दि.16) बावधन बुद्रुक येथील घुले स्क्वेअर पाटील नगर येथील हायक्लास सोसायटी जवळ रात्री साडेसातच्या सुमारास घडली. याप्रकरणी पाच जणांविरुद्ध हिंजवडी पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करुन दोघांना अटक केली आहे.

मंदार अर्जुन घुले, महेश अर्जुन घुले असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर वैभव हरिश्चचंद्र पडवळ, शैलेश मधुकर घुले, रणजित मुंजकर ऊर्फ गड्ड्या यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर बावधन ग्रामपंचायतीचे कर्मचारी विकी राजु मारवाडी कुंभार (वय-30 रा. बावधन बुद्रुक, ता. मुळशी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे ग्रामपंचायतमध्ये सुपरवायझर म्हणून कार्यरत आहेत. शुक्रवारी बावधन बुद्रुक ग्रामपंचायत ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार ते ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या मदतीने भिकाजी कॉर्नर येथील विना परवाना वाढदिवस आणि इतर लावलेले फ्लेक्स काढत होते. त्यावेळी त्यांनी आरोपी मंदार घुले याच्या वाढदिवसाचा फ्लेक्स काढला. फ्लेक्स काढल्याची माहिती समजल्यावर आरोपीने फिर्यादी यांना फोन करुन शिविगाळ करुन घुले स्क्वेअर जवळ बोलावून घेतले.

फिर्यादी घुले स्क्वेअर जवळ आले असता मंदार घुले याने फ्लेक्स काढल्याच्या रागातून शिविगाळ करुन मारहाण करण्यास सुरवात केली. तर इतर आरोपींनी रस्त्याच्या बाजूला पडलेल्या दगडाने फिर्यादी यांच्या डोक्यात मारुन गंभीर दुखापत केली. फिर्यादी सोबत असलेल्या इतर ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी भांडण सोडवण्याच प्रयत्न केला. त्यावेळी आरोपींनी त्यांना देखील बेदम मारहाण केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अजित काकडे करीत आहेत.