हिंजवडी आयटी पार्कमध्ये पाकिस्तानचा झेंडा फडकवणाऱ्या तरुणांचा शोध सुरु

हिंजवडी (पिंपरी-चिंचवड) : पोलीसनामा ऑनलाईन – पुलवामा हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या जवानांना देशभरातून श्रद्धांजली वाहीली जात असतानाच, हिंजवडी आयटी हबमध्ये काही तरुण पाकिस्तानचा झेंडा घेऊन दुचाकीवरुन फिरताना दिसले. ही बाब पुणे पोलिसांना लक्षात आल्यानंतर त्यांनी पिंपरी चिंचवड नियंत्रण कक्षाला याची माहिती दिली. पोलिसांनी सीसीटीव्ही तपासले असता दोन तरुण पाकिस्तानचा झेंडा घेऊन दुचाकीवरुन जातानाची दृष्य सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहेत. हिंजवडी पोलिसांसह पिंपरी चिंचवड आयुक्तालयातील पोलीस या तरुणांचा शोध घेत आहेत. मात्र, हे तरुण अद्याप पोलिसांच्या हाती लागले नाहीत.

पिंपरी-चिंचवड शहरातील मुख्य चौकांमध्ये सुरू असलेल्या ‘सीसीटीव्ही’ फुटेजचे प्रेक्षपण पुणे शहर पोलिसांकडे देखील केले जाते. त्यामुळे पुणे पोलिसांकडूनही या फुटेजचे निरीक्षण केले जाते. शनिवारी, (दि. 16) दुपारी बाराच्या सुमारास हिंजवडीतील फुटेज पाहत असताना, पुणे पोलिसांना दोन अनोळखी तरुण स्प्लेंडर या दुचाकीवर पाकिस्तानचा झेंडा घेऊन परिसरात घिरट्या घालत असल्याचे दिसून आले.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेत, त्यांनी याबाबत पिंपरी-चिंचवड पोलिस नियंत्रण कक्षाला माहिती दिली. पिंपरी-चिंचवड नियंत्रण कक्षाला माहिती मिळताच त्यांनी हिंजवडीसह आजूबाजूच्या पोलिस ठाण्यात अलर्ट जारी केला. त्यानुसार हिंजवडी, वाकड आणि सांगवी पोलिस ठाण्यातील पोलिसांनी त्या तरुणांचा शोध सुरू केला. पोलिसांनी सर्व परिसर पिंजून काढला. मात्र, रात्री उशिरापर्यंत त्या तरुणांचा शोध लागला नाही.

नियंत्रण कक्षाकडून मिळलेल्या माहितीनुसार तत्काळ टीम रवाना करण्यात आली. दिवसभरात हिंजवडीचा संपूर्ण परिसर पिंजून काढण्यात आला आहे. मात्र, नियंत्रण कक्षाकडून मिळालेल्या वर्णनाचे तरुण अद्याप हाती लागले नाहीत. त्या तरुणांच्या शोधात पोलिसांची एक टीम हद्दीमध्ये गस्त घालत असल्याचे हिंजवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत गवारी यांनी सांगितले.