Hinjewadi News : फेज -2 मध्ये दोन लाखाच्या बनावट नोटासह एकाला अटक

हिंजवडी/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – हिंजवडी फेज-2 येथे एका व्यक्तीकडून भारतीय चलनातील बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहे. आरोपीला अटक करुन त्याच्याकडून 2 लाख 150 रुपये किमतीच्या बनावट नोटा जप्त करुन 9 लाख 50 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई मंगळवारी (दि.2) रात्री साडेदहाच्या सुमारास फेज-2 येथील राजीव गांधी आयटी पार्क येथील एमक्युअर कंपनीजवळील कॅनलच्या रोडवर करण्यात आली. ही कारवाई गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने केली.

संजय उर्फ भोला विश्वनाथ रॉय (वय-50 रा. काका हलवाई समोर, हिंजवडी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी गुन्हे शाखा युनिट दोनचे पोलीस उपनिरीक्षक प्रसन्न त्रिंबक जऱ्हाड यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपीला ताब्यात घेऊन अंगझडती घेतली. त्यावेळी त्याच्याकडे 9 लाख रुपयांची रोख रक्कम आढळून आली. त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता ही रक्कम गांजा विक्रीतून मिळाल्याचे सांगितले. आरोपीने 1 लाख 54 हजार 125 रुपये किमतीचा 6 किलो 165 ग्रॅम वजनाचा गांजाची विक्री करुन 9 लाख रुपये मिळवल्याचे तपासात समोर आले. तसेच आरोपीकडून 2 लाख 150 रुपये किमतीच्या भारतीय चलनातील बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. पोलिसांनी बनावट नोटा, दुचाकी, रोख रक्कम असा एकूण 9 लाख 50 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. पुढील तपास हिंजवडी पोलीस करीत आहेत.