Hinjewadi News : आयटी हब परिसरात सुरू असलेल्या Online ‘सेक्स’ रॅकेटचा पर्दाफाश

हिंजवडी/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – आयटी हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंजवडीमध्ये ऑनलाईन सेक्स रॅकेटचा हिंजवडी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत महाराष्ट्र, आसाम व बिहार राज्यातील चार महिलांची सुटका करण्यात आली आहे. तर तीन जणांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई भुमवकर वस्ती येथील आदिती एक्झिक्युटीव्ह ओ यो हॉटेल येथे करण्यात आली.

जीवन संतोष ताथवडे (वय-23 रा. चिंचवडेनगर, चिंचवड, मुळ रा. पिपंळवडी ता. खेड), रामदास सोपानराव साळुंखे (वय-62 रा. महाराष्ट्र हौ. बोर्ड, येरवडा), अनिकेत चंद्रकांत भालेराव (वय-26 रा. त्रिमुर्ती हाईट्स, रावेत) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर केशव, राहुल आणि दिपक उर्फ बॉबी (पुर्ण नाव माहित नाही) हे फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) अजय विनायकराव जोगदंड यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, Hinjewadi Escorts या सोशल साईटवरून वेश्यागमनासाठी मुली पुरविल्या जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी गूगलवर Hinjewadi Escorts सर्च केले असता www.callgirlsuvidha.com.hinjewadi, Hinjewadi Escorts 0913077008 Jinjewadi call, Hinjewadi Escorts it Employees private in Hinjewadi Pune, Hinjewadi Escorts Sexy lips and gorgesous Smiles That Can… या साईट आढळून आल्या. पोलिसांनी साईटवर दिलेल्या नंबरवर बनावट ग्राहकामार्फत कॉल करून खात्री केली. त्यावेळी वेश्यागमनासाठी महिला पुरवण्यात येत असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी तीन जणांना अटक करुन चार महिलांची सुटका केली. हा वेश्याव्यवसाय करण्यासाठी आरोपी ऑनलाईन पद्धतीने ओयो या कंपनीचे भुमकर वस्ती येथील आदिती एक्झिक्युटीव्ह ओ यो हॉटेलचा वापर करत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

अटक करण्यात आलेले आरोपी आणि त्यांचे इतर साथिदार साइट मध्ये दिलेल्या नंबरवर कॉल केल्यानंतर ग्राहकाला मुलींचे फोटो पाठवत. ग्राहकाला पाहिजे असलेल्या ठिकाणी मुली पुरवण्याच्या मोबदल्यात 8 ते 20 हजार एवढी रक्कम घेत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून एक अ‍ॅटो रिक्षा, दोन मोबाईल असा एकूण 70 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त गुन्हे सुधीर हिरेमठ, परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त आनंद भोईटे, वाकड विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त गणेश बिरादार यांच्या मार्गदर्शनाखाली हिंजवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अजय जोगदंड, पोलीस उपनिरीक्षक पंडित आहिरे, पोलीस हवालदार किरण पवार, नितीन पराळे, दिपक शिंदे, पोलीस नाईक विजय घाडगे, रवी पवार, महिला पोलीस अंमलदार तेजश्री म्हैशाळे, पुनम आल्हाट, सुप्रिया सानप यांच्या पथकाने केली.