पित्याच्या निधनानंतरही ‘ते’ करत राहिले बजेटची ‘प्रिंटिंग ड्युटी’

नवी दिल्ली : वृत्त संस्था – अर्थमंत्री निर्मला सितारामन या आज अर्थसंकल्प संसदेत सादर करतील. मात्र, त्याचे प्रिटिंग गेल्या १० दिवसांपासून सुरु आहे. प्रिंटिंग सुरु असताना कोणालाही घरी सोडले जात नाही. यादरम्यान एका उपव्यवस्थापकाच्या वडिलांचे निधन झाले. मोठा बाका प्रसंग निर्माण झाला होता. संबंधित अधिकाऱ्याला घरी सोडायचे तर नियमांचे उल्लंघन होणार आणि नाही सोडले तर वेगळा संदेश बाहेर जाण्याची होती.

मात्र, या अधिकाऱ्याने पहिले कामावर निष्ठा ठेवून घरी न जाण्याचा निर्णय घेतला. अर्थसंकल्पाची गोपनीयता कायम राहण्यासाठी मदत केली. कुलदीप शर्मा याचे या उपव्यवस्थापकाचे नाव आहे. वित्त मंत्रालयाने ट्विट करत ही माहिती जाहीर केली. कुलदीप शर्मा यांच्या वडिलांचे २६ जानेवारी रोजी अचानक निधन झाले. त्यावेळी ते बजेट छपाईच्या ड्युटीवर होते. वैयक्तिक भावभावनांपेक्षा आपल्या कर्तव्याला त्यांनी महत्व दिले. त्यांनी वडिलांच्या मृत्युनंतर अंत्यसंस्काराला जाण्याऐवजी अर्थसंकल्पाच्या छपाईचे काम करत राहण्याचे ठरविले.

कुलदीप शर्मा यांच्याकडे अत्यंत महत्वाची जबाबदारी होती. ते आपल्या कामातील गोपनीयताचे महत्व जाणून होते. त्यामुळे वडिलांच्या निधनानंतरही ते घरी न जाता अर्थसंकल्पाच्या गोपनीय प्रक्रियेवर त्यांनी कोणताही अडथळा आणू दिला नाही. अर्थसंकल्पाची छपाई खूप गोपनीय असते. या छपाईच्या प्रक्रियेत सहभागी असणाऱ्या लोकांना अर्थसंकल्पातील बाबी बाहेर पडू नये, म्हणून एकदा छपाईचे काम त्यांच्याकडे गेल्यानंतर त्यांना त्या परिसरातून बाहेर पडता येत नाही.

त्या सर्वांचे एक वेगळे जगच त्या १० दिवसात निर्माण झालेले असते. छपाईशी संबंधित कोणालाही प्रिंटिंग प्रेसच्या बाहेर जाऊन दिले जात नाही. मात्र, वडिलांचे निधन झाल्यानंतर आता कुलदीप शर्मा यांना घरी जाऊन द्यायचे का. घरी जाण्यासाठी सोडले तर त्यातून नियमांचे उल्लंघन केले जाणार होते. त्याचबरोबर अर्थसंकल्पाची गोपनीयतेत बाधा आली असती. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर मोठा बाका प्रसंग आला होता. पण कुलदीप शर्मा यांनी घरी न जाता कामावर थांबण्याचा थांबण्याचा निर्णय घेतला आणि सर्वांचीच सुटका केली.