भाजप उमेदवार सोनाली फोगाट म्हणाली – ‘भारत माता की जय’ न म्हणणारे ‘पाकिस्तानी’ !

हिसार (हरियाणा) : वृत्तसंस्था – हरियाणा मधील आदमपूर विधानसभा मतदारसंघातील भाजपाची उमेदवार सोनाली फोगाट ही तिच्या टिकटॉक वरील व्हिडिओबद्दल सोनाली फोगाट चांगलीच चर्चेत आहे. काहीजण तिला टिकटॉक स्टार म्हणून संबोधत आहेत तर काहीजण तिकीट देण्यास विरोध करीत आहेत. या सर्वांमध्ये सोनाली मात्र प्रचारात व्यस्त आहे.

मंगळवारी निवडणूक प्रचारादरम्यान सोनालीने ‘भारत माता की जय’ न बोलणाऱ्यांना थेट ‘पाकिस्तानी’ म्हटले आहे. जे घोषणाबाजी करत नाहीत, त्यांना लाज वाटायला हवी असे सोनाली म्हणाली. यावेळी सोनाली म्हणाली की ज्यांना देशाचा विजयघोष करता येत नाही त्यांची मला लाज वाटते.

४० वर्षांची फोगाट ग्रामीण भागात घरोघरी प्रचार करत आहे. निवडणूक प्रचारात उतरलेल्या सोनाली फोगाट हिला निवडणुकीच्या लढतींबद्दल विचारले असता तिने यास आव्हान मानत नसल्याचे म्हटले आहे. ती म्हणाली की जेव्हा एखादी व्यक्ती काहीतरी चांगले करायला जाते, तेव्हा लाखो, कोट्यावधी लोक त्याच्यात सामील होतात, पंतप्रधान नरेंद्र मोदी याचे उत्तम उदाहरण आहेत.

दरम्यान, भारतीय जनता पक्षाने हरयाणातील आदमपूर विधानसभा मतदार संघातून टिकटॉक स्टार सोनाली फोगाट यांना आपले उमेदवार केले आहे. ही जागा हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भजनलाल यांचा बालेकिल्ला मानली जाते. दिवंगत भजनलाल यांचा मुलगा कुलदीप बिश्नोई येथून तीन वेळा कॉंग्रेसचे आमदार राहिले आहेत. भजनलाल आठ वेळा या विधानसभा मतदारसंघातून आमदार होते. या जाट बहुल क्षेत्रात १.६० लाखाहून अधिक मतदार असून एकूण १५ उमेदवार रिंगणात आहेत.

Visit : Policenama.com