भाजपा नेत्या सोनाली फोगाट यांच्या घरी चोरी, लाखो रुपयांची ज्वेलरी-रोकड आणि रिव्हॉल्वर चोरट्यांनी पळवले

हिसार : भाजपा नेत्या सोनाली फोगाट यांच्या बंद घराचा टाळा फोडून चोरांनी लाखो रुपयांची ज्वेलरी, रोख रक्कमेसह लायसन्सचे रिव्हॉल्वर, एक डीव्हीआर चोरी केला. चोरीची माहिती मिळताच प्रमुख पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहचले आणि तपास केला. फिंगर एक्सपर्ट टीमला सुद्धा घटनास्थळी पाचारण करण्यात आले होते. पोलिसांनी तपास करत पुरावा गोळा करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणात सीसीटीव्ही फुटेज सुद्धा मिळवण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत. तर आजूबाजूच्या लोकांची सुद्धा चौकशी केली जात आहे.

प्रकरणात डोगरान मोहल्ला येथे राहणार्‍या भाजपा नेत्या सोनाली फोगाट यांनी एचटीएम पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांना दिलेल्या तक्रारीत सोनाली यांनी म्हटले की, 9 फेब्रुवारीला त्या आपल्या घराला टाळा लावून चंदीगढला गेल्या होत्या. 15 फेब्रुवारीला चंदीगढहून हिसारला परतल्या तेव्हा घराचा टाळा तोडलेला होता. आत जाऊन पाहिले असता वरील कपाटातून 10 लाख रुपये चोरीस गेले होते, सोने-चांदीची भांडी, घड्याळे, 22 बोअरचे एक लायसन्स असलेले रिव्हॉल्वर गायब होते, रिव्हॉल्वरमध्ये 8 बुलेट लोड केलेल्या होत्या.

पोलिसांनी दाखल केले प्रकरण
फोगाट यांनी तक्रारीत म्हटले की, रिव्हॉल्वरच्या होलस्टरमध्ये टाकलेल्या बुलेटसुद्धा मिळाल्या नाहीत. तसेच इतर सामान सुद्धा चोरीस गेले आहे. तसेच एक डीव्हीआर सुद्धा चोरीस गेला आहे. याप्रकरणी एचटीएम पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पोलीस प्रशासनावर उपस्थित केले प्रश्न
सोनाली फोगाट यांनी आपल्या घरात चोरीची घटना घडल्याने पोलिसांवर प्रश्न उपस्थित केले आहेत. सोनाली यांनी म्हटले की, जर नेत्यांची घरं सुरक्षित नाहीत, तर सामान्य लोकांनी पोलिसांकडून कोणती अपेक्षा करायची. काही दिवसांपूर्वीच या परिसरात चोरी झाली होती, ते प्रकरणसुद्धा पोलिसांना ट्रेस करता आले नाही. पोलिसांनी आपली जबाबदारी समजून घ्यावी.