विवाहित मुलींनाही मिळू शकते ‘अनुकंप’खाली नियुक्ती; हायकोर्टाचा ऐतिहासिक निर्णय

जबलपूर : पोलिसनामा ऑनलाईन – मध्य प्रदेश राज्यातील जबलपूर उच्च न्यायालयाने विवाहित मुलींना अनुकंपा नियुक्ती मिळवून दिली आहे. एका खटल्याची सुनावणी झाल्यानंतर न्यायमूर्ती संजय द्विवेदी यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला आहे. न्यायालयाने पोलिस मुख्यालयाचा आदेश रद्द केला आहे, ज्यात मृत व्यक्तीच्या मुलीला अनुकंप नियुक्तीसाठी अपात्र ठरवलं गेलं होतं.

खरंतर, सुहागी येथील राहणार्‍या प्रीती सिंगने न्यायालयात याचिका दाखल केली होती. ज्यात तिने सांगितले की, तिची आई मोहनी सिंग सतना जिल्ह्यातील कोलगवां पोलिस ठाण्यात एएसआय पदावर कार्यरत होती. 23 ऑक्टोबर 2014 रोजी कर्तव्यावर/ड्युटीवर जात असताना त्यांचा मृत्यू झाला. त्या दोन बहिणी असून दोघीनींही लग्न केलं आहे.

आईच्या निधनानंतर प्रीती सिंगने अनुकंप नियुक्तीसाठी अर्ज केला होता. पण, पोलिस मुख्यालयाने तिला अपात्र घोषित केले. 22 जानेवारी 2015 रोजी पोलिस मुख्यालयाने अनुकंप नियुक्ती निती परिच्छेद 2.4 नमूद करून एक पत्र जारी केले आहे, ज्यात असे म्हटले आहे की, विवाहित मुलीला अनुकंप नियुक्ती देता येणार नाही. यानंतर पीडितेने न्यायालयात खटला दाखल केला.

आता न्यायालयाने प्रीती सिंगच्या बाजूने निकाल दिला आहे. या प्रकरणात, याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे की, या घटनेच्या कलम 14 नुसार कोणालाही स्त्रीला स्त्री असल्याच्या आधारे भेदभाव केला जाऊ शकत नाही. अंतिम सुनावणीनंतर हायकोर्टाने याचिकाकर्त्यास अनुकंप नियुक्तीसाठी अपात्र ठरविण्याचा आदेश रद्द केला आहे.