छत्रपती शिवाजी महाराज अन् संभाजी महाराजांचा इतिहास देशापुरता संकुचित ठेवणार का ?

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – छत्रपती शिवाजी महाराज (chhatrapati shivaji maharaj) , संभाजी महाराजांचा इतिहास हा आपण महाराष्ट्र, देशापुरता संकुचित ठेवणार आहोत‌ का? हा इतिहास आंतरराष्ट्रीय स्तरावर कसा न्यायचा‌,‌‌ याचा विचार आता करावा लागणार आहे. हा इतिहास पुढे गेला नाही, तर ही ऐतिहासिक चूक ठरेल, असे प्रतिपादन विधानपरिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांनी केले. व्हिएतनामाचे लोक रायगडावर येतात आणि तेथील माती घेऊन जातात, यातून आपला इतिहास काय,‌ हे‌ समजून घेतले पाहिजे. म्हणूनच कर्तव्य म्हणून आपला इतिहास आपण पुढे नेला पाहिजे, असे ते म्हणाले.

‘छत्रपती संभाजी महाराजांची राजनीती’ या डॉ. केदार फाळके लिखित पुस्तकाच्या प्रकाशनावेळी रामराजे बोलत होते. यावेळी ज्येष्ठ विचारवंत डॉ. सदानंद मोरे, इतिहासतज्ज्ञ पांडुरंग बलकवडे, डॉ. फाळके, भांडारकर संंस्थेचे विश्वस्त प्रदीप रावत, भूपाल पटवर्धन, सुधीर वैशंपायन यावेळी उपस्थित होते.

यावेळी रामराजे म्हणाले, राजकारणाच्या पलीकडे जाऊन आपले कर्तव्य बजावले पाहिजे, तरच योग्य इतिहास पुढच्या पिढीपर्यंत जाईल. मी तीन दशके राजकारण केले, पण राजगडच्या पायथ्याशी असणारी सईबाईंची समाधीचे पुनर्निमाण करू शकलो नाही, अशी खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली.

डॉ. मोरे म्हणाले, मराठ्यांच्या इतिहासाची पुनर्मांडणी आम्ही करीत आहोत. एनसीईआरटीच्या पुस्तकांमध्ये मराठ्यांचा इतिहास येत नव्हता, त्यासाठी चळवळ चालविली आहे. मराठ्यांचा इतिहास जागतिक करायचा असेल, त्याच परिभाषेत त्याची मांडणी करावी लागेल. डॉ. केदार फाळके म्हणाले, संभाजी महाराजांचे राज्य म्हणजे रयतेचेच राज्य होते. देव, देश आणि धर्मासाठी त्यांना प्राणांची आहुती दिली. आदर्श राज्यकर्ता, त्यांचे शौर्य आणि बलिदान यांसाठी त्यांचे आपण स्मरण केले पाहिजे. संभाजी महाराजांच्या काळातील अर्थ व्यवस्था, न्याय व्यवस्था, जमीन महसूल, वतन आणि इनाम विषयक धोरण, आदी अशा त्यावेळच्या भक्कम राजव्यवस्थांचा, तसेच त्यांच्या मोहिमांचा तपशील फाळके यांनी विषद केला.